मोदींचे हिंदूत्व हे धर्म आणि जातीपातीचे नव्हे तर विकासाचे; हिंदूत्व आमच्या डोक्यात तर पुरोगामीत्व ह्य्दयात
कृष्णात चौगले कोल्हापूर
लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी केवळ सहा दिवस उरले आहेत. त्यामुळे निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा, मेळावे, रॅली, बैठकांचा धडाका सुरु आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्याकडून प्रचारयंत्रणा कशा प्रकारे राबविली जात आहे ? गेल्या पाच वर्षात त्यांनी कोणती विकासकामे केली ? विरोधकांकडून होणाऱ्या आरोप, प्रत्यारोपांबाबत त्यांची काय भूमिका आहे ? याचा उहापोह करण्यासाठी ‘तरूण भारत संवाद’ने घेतलेली मुलाखत…..!
पहा VIDEO >>>मोदींचे हिंदूत्व हे धर्म आणि जातीपातीचे नव्हे तर विकासाचे- संजय मंडलिक
1 प्रश्न – कोल्हापूरची निवडणूक हिंदूत्ववाद विरुध्द पुरगोमीत्व असल्याचा आरोप होतोय, याबाबत आपले काय मत आहे ?
– कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक म्हणजे हिंदुत्ववाद विरुद्ध पुरोगामित्व अशी होत नसून हिंदुत्व विरुद्ध पुराणमतवाद अशी आहे. पुराणमतवाद म्हणजे शंभर वर्षांपूर्वीचे सांगायचे, सध्याचे काही बोलायचे नाही. आमचे हिंदुत्व हे जातपात आणि धर्माला अनुसरून नाही. मोदीजींचे विकासाचे हिंदुत्व आहे. देशामध्ये एकोपा निर्माण व्हावा, देशाचा विकास व्हावा या संकल्पनेतून स्विकारलेले हे हिंदुत्व असून ते आमच्या डोक्यात आहे. तर पुरोगामीत्व आमच्या ह्य्दयात आहे. हे हिंदुत्व केवळ जातीपातीचे नसून विकासाचे आहे. हिंदुत्वाचा हा अजेंडा गेल्या दहा वर्षात यशस्वी झाला असून पुढील काळात अधिक ताकदीने तो यशस्वी होणार आहे.
प्रश्न-2 गेल्या पाच वर्षात मतदारसंघात झालेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचली आहे काय ?
– सुरुवातीच्या काळात माझी उमेदवारी घोषित होण्यासाठी थोडा उशीर झाला. त्यानंतर महायुतीच्या घटकपक्षांचे मेळावे घेण्यासाठी थोडा वेळ झाला. पण त्या मेळाव्यामध्ये झालेल्या समन्वयाच्या माध्यमातून माझी कामे घरोघरी पोहोचवण्यासाठी मोठी यंत्रणा मला मिळाली. त्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत माझ्यासह राज्य आणि मोदी सरकारची कामे सर्वसामान्यापर्यंत जनतेपर्यंत पोहोचली आहेत. यामध्ये ग्रामीण भागासाठी 800 कोटींची कामे झाली आहेत. याशिवाय कोल्हापूर विमनातळ, पुणे-बेंगलोर, नागपूर-हैदराबाद, अंबोलीमार्गे कोकणात जाणार रस्ता या तीन राष्ट्रीय महामार्गासह, पंतप्रधान सडक योजना, सीआरएफ फंड, नाबार्डच्या माध्यमातूनही कोट्यावधी रूपयांचा निधी मिळाला आहे. कळे-गगनबावडा रस्त्याच्या भूसंपदानासाठीही नुकताच निधी मंजूर झाला आहे.
प्रश्न- 3 कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग कधी मार्गी लागणार ?
माझे वडील दिवंगत सदाशिराव मंडलिक हे खासदार असल्यापासून कोल्हापूर-वैभावाडी रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा सुरु आहे. मधल्या काळात हा प्रकल्प गुंडाळला की काय अशी परिस्थिती होती. पण यावर्षी केंद्रसरकारने विषेशत: अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना ‘गतीशक्ती’ योजना काढली. यामध्ये रखडलेल्या प्रकल्पांना कायमपणे गती देणे, शक्ती देणे अशी भूमिका घेतली. टोकण ग्रँड लागली नसल्यामुळे हा प्रकल्प बंद पडला की काय असे वाटत होते. पण गतीशक्ती योजनेतून या प्रकल्पाचा सर्व्हे पूर्ण झाला असून आवश्यक निधीही लवकरच दिला जाईल. त्यामुळे माझ्या खासदारकीच्या काळात या मार्गाला गती देण्यासाठी यश आले आहे असे म्हणावे लागेल. तसेच आमच्या प्रचारसभेसाठी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल असे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे हा प्रकल्प निश्चितपणे मार्गी लागेल.
प्रश्न-4 निष्क्रीय खासदार म्हणून आपल्यावर आरोप होतोय त्याबाबत आपली काय भूमिका आहे ?
एका चाणक्याने चुकीचे ‘नॅरेटिव्ह सेट’ करण्याचा प्रयत्न केला असून त्याबाबत मी वारंवार सांगितले आहे. माझा संपर्क नसता मला एवढा प्रतिसाद मिळाला नसता. घटकपक्षांचे सर्व कार्यकर्ते माझ्या प्रचारासाठी आले नसते. मी जनतेच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्या नेत्याच्या संपर्कात राहण्यासाठी मी कमी पडलो असेल. पण मी त्यांच्या संपर्कात राहिले असतो, तर ‘आपलं ठरलयं, तुपलं ठरलयं’ यात मी अडकलो असतो. मला त्यामध्ये अडकायचे नव्हते. खऱ्या अर्थाने ज्या शिवसेना-भाजप पक्षाने मला उमेदवारी दिली आहे, त्यांचा अजेंडा घेऊन मला पुढे जायचे आहे. सोयीप्रमाणे काम करणारी ही मंडळी आहे. गेल्या लोकसभा निवडणुमध्ये त्यांना आम्ही हिंदुत्ववादी वाटलो नाही. त्यांचे स्वत:च राजकारण म्हणून ते माझ्याबरोबर आले होते. एखादी व्यक्ती जर कायमपणे जिह्याची दिशा ठरवत असेल तर ते चुकीचे आहे. मी म्हणेल तोच आमदार आणि खासदार. मी म्हणेल तोच जिल्हा बँक आणि गोकुळचा संचालक असा अहंकार काही मंडळींना झाला आहे. पण ही परिस्थिती आता भविष्यात राहणार नाही. या अहंकाराला लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून जनता उत्तर देईल.
प्रश्न -5 मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर तीन दिवस तळ ठोकल्याबद्दल विरोधकांचा आरोप होतोय, त्याबद्दल आपले काय मत आहे ?
– सतेज पाटील यांना आमच्या नेत्याची भिती वाटू लागली असून त्यांनी धसका घेतला आहे. मुख्यमंत्री हे केवळ माझ्याच मतदारसंघात येतात असे नाही. ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार उभा आहेत, त्या सर्व ठिकाणी ते जात आहेत. ही निवडणूक आपल्या विचारच्या माणसांना निवडून आणण्यासाठी आहे. कोणावर दबाव टाकण्यासाठी अथवा कोणाला पाडण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत नसून स्वत: जिंकण्यासाठी लढत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरी आमचे नेते असले तरी त्यांचा मूळ स्वभाव हा कार्यकर्त्याचा आहे. केवळ मते मागण्यासाठी मुख्यमंत्री तीन दिवस कोल्हापूरात आले नसून यापूर्वी अनेक अडचणींच्या काळात त्यांनी कोल्हापुरला मदतीचा हात दिला आहे. विशेषत: 2019 च्या पूरपरिस्थितीमध्ये लोकांच्या मदतीसाठी स्वत: पुरात उतरले होते. त्यावेळी ते आपल्या कार्यकर्त्यांनाही पाठवून देऊ शकले असते. पण त्यांनी कोल्हापुरात थांबून पूरग्रस्थांना साहित्य वाटप केले. त्यांचे स्थलांतर केले. त्या कालावधीत मुंबईहून सुमारे वीसहून अधिक ट्रक संसार उपयोगी साहित्य आणून पूरग्रस्तांना वाटले. डॉक्टर आणि औषधे देखील घेऊन आले. कोरोना काळातही त्यांनी कोल्हापूरला मोलाचे सहकार्य केले. तसेच कोल्हापुरची महालक्ष्मी एक्सप्रेस ज्यावेळी पाण्यात अडकली, त्यावेळी पहिल्यांदा मदतीसाठी धावून जाणारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच होते.
प्रश्न 6 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे मताधिक्यामध्ये किती फरक पडणार ?
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापुरातील सभेमुळे मताधिक्यामध्ये फार मोठा फरक पडणार आहे. मताधिक्याची लाट निर्माण झाली असून त्याचे मोजमाप निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होईल. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने केलेली विकासकामे, सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या योजना यामुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात 45 तर देशात 400 हून अधिक जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील.