लोकसभा विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांचा बहुचर्चित कोल्हापूर दौरा आज होत आहे. आज सकाळी त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाल्यावर त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत करवीर तालुक्यातील उचगावातील अजित तुकाराम सनदे यांच्या घरी भेट दिली.
टेम्पो चालक असलेल्या अजित सनदे या सामान्य नागरीकाच्या घरी जाऊन त्यांनी त्यांच्या कुटुंबाची विचारपूस केली. त्यांच्या या भेटीची चर्चा जिल्ह्यासह राज्यभरात होत आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी आज कोल्हापूरात आहेत. काल त्यांच्या विमानामध्ये तांत्रिक अडचण आल्याने ते येऊ शकले नाहीत त्यामुळे त्यांचा दोन दिवसाचा कोल्हापूर दौरा एक दिवसांवर आला. कसबा बावड्यातील भगवा चौकात येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा बहूशसत्रधारी अशा पुतळ्याचे अनावरण आणि लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते होत आहे. यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटी आणि कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे.
राहूल गांधींनी आज कोल्हापूरात उतरल्यावर आपला ताफा थेट अजित सनदे यांच्या उचगावातील घराकडे वळवला. उचगावातील आंबेडकर चौकात राहत असलेले अजित तुकाराम सने हे पेशाने टेम्पो चालक असून त्यांच्या घरी जाऊन राहूल गांधींनी त्यांच्या कुटुंबाची चौकशी केली. या भेटीत त्यांनी अजित सनदे यांच्या व्यवसायाविषयी माहीती जाणून घेऊन त्यांना या व्यवसायामध्ये कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे यावरच चर्चा केली.