खोची/वार्ताहर
खोची परिसरात मंगळवारी व बुधवारी ढगफुटी सदृश पडलेल्या पावसाने गुरुवारी व शुक्रवारी सायंकाळी पूर्ण उघडीप दिली होती. मात्र शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास प्रचंड विजांच्या गडगडासह पडलेल्या दीड तास पावसाने खोची परिसरात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. यामध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतातून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे.
कापणी झालेले सोयाबीन व भुईमूग शेंगा या पाण्यामुळे काही ठिकाणी तरंगत होत्या. तर काही ठिकाणी वाहून गेल्या आहेत. मुसळधार पडलेल्या पाण्यामुळे खोची-बुवाचे वठार, बुवाचे वठार-नरंदे, बुवाचे वठार-कुंभोज, नरंदे- शरद कारखाना, खोची-भेंडवडे या सर्व रस्त्यावरती पावसाचे पाणी आल्याने तसेच भेंडवडे येथील चौकात लक्ष्मी ओढ्याचे पाणी आल्याने सदर मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. सदर मार्गावरील पाणी कमी झाल्यावरच वाहतूक सुरू होणार आहे. तसेच वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पावसाचा जोर कमी होताच वीज पुरवठा सुरू झाला.









