नवी दिल्ली / वृत्तसंस्था
येत्या काही दिवसांत जरी कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली तरी गंभीर रुग्ण आणि मृतांच्या संख्येत फारशी वाढ होणार नाही, असे एम्सच्या प्राध्यापकांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवासांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यातच आता कोरोनाबाबत एक दिलासादायी बातमी समोर आली आहे. येत्या काही दिवसांत देशात कोरोनाची प्रकरणे वाढणार नाहीत. दुसरी आणि तिसरी लाट नियंत्रित राहिल्यानंतर आपल्या देशातील सद्यस्थिती चांगली आहे. साहजिकच चौथ्या लाटेचा मोठा धोका भारताला बसणार नसल्याचा दावा देशातील सर्वात मोठी वैद्यकीय संस्थेतील (एम्स) सेंटर फॉर कम्युनिटी मेडिसिनचे प्रोफेसर डॉ. संजय रॉय यांनी व्यक्त केला आहे.
कोरोनासदृश विषाणू लवकर निघून जात नाही. अशा व्हायरल आजारांमध्ये रुग्णसंख्येत चढ-उतार होतच असतात. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली तरी देशाने आता नेहमीप्रमाणे पुढे जावे. दीर्घकालीन परिणाम आत्तापर्यंत फारसा होणार नाही. प्रकरणांची संख्या वाढू शकते ज्यात फारसा फरक पडणार नाही कारण आरएनए विषाणूचे स्वरूप सतत बदलत असते, असे मतही रॉय यांनी व्यक्त केले.









