कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर शहर राजर्षी शाहू महाराज यांचे शहर आहे. त्यामुळे शहराने सर्वबाबती अग्रेसर असेल पाहिजे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत कायापलट होईल अशी कामे करून सर्वच बाबतीत शहर टॉपवर आणा, अशा सूचना पालकमंत्री दिपक केसरकर यांनी महापालिका अधिकाऱयांना केल्या. कोल्हापूर महापालिकेमध्ये विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. खासदार धैर्यशील माने, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पाटील म्हणाले, नागरिकांची ज्या ठिकाणी वर्दळ असते. त्या परिसरात मनपाकडून सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत. शाळा, महाविद्यालयाबरोबरच स्मशानभूमी, मटन मार्केटचा परिसर सुस्थितीमध्येच असला पाहिजे. विशेष करून शहर स्वच्छतेला प्राधान्या देण्यात यावे. मुंबईमध्ये दिवसा पाच वेळा सार्वजाणिक स्वच्छतागृहांची स्वच्छता होते. याचधर्तीवर कोल्हापूर शहरात स्वच्छता ठेवावी. लहान स्वरूपातील विकासकामांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. जिल्हा नियोजनमधून अशा कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. दोन महिन्यांत फरक जाणवेल असे काम करून दाखवा, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी केल्या.
‘अंबाबाई तीर्थक्षेत्रा’तील कामे दर्जदार करा
अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडांतर्गत सुरू असलेल्या कामांचे शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी माहिती दिली. ते म्हणाले, 8 कोटी 20 लाखांच्या निधीतून सरस्वती टॉकीजसमोरील बहुमजली पार्कींगमध्ये 300 वाहनांचे पार्कींग होणार असून याच ठिकाणी भक्ती निवासचे नियोजन आहे. यावर पालकमंत्री पाटील यांनी भक्ती निवास दर्जेदार झाले पाहिजे. भक्तांना सर्व सुविधा येथे उपलब्ध करा. येथील कामांसाठी जसा निधी खर्च होईल तसा पुढील टप्प्यातील निधी देवू, असे स्पष्ट केले.
पालकमंत्री महापालिकेत पहिल्यांदाच
पालकमंत्री केसरकर आणि जिल्हाधिकारी राहूल रेखावार कोल्हापूर महापालिकेत प्रथमच आले. याबद्दल त्यांचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
कोल्हापूरचे वैशिष्टे दिसेल अशी रंकाळय़ांची कामे करा
रंकाळा तलावाच्या परिसरात 9 कोटी 87 लाखांच्या निधीतून संवर्धन आणि सुशोभिकरणची कामे होत असून याची माहिती अर्किटेक्ट सुरज जाधव यांनी दिली. यावर पालकमंत्री केसरकर यांनी जयपुरच्या धर्तीवर तलावात जुन्या पद्धतीचा बोटीचा वापर करावा. सुरक्षा भिंत, बैठक व्यवस्थेसाठी काळा रंगाचे दगडाचा वापर करा. शहरात कोणतीही विकास कामे करताना कोल्हापूरचे वैशिष्टे दिसेल अशा पद्धतीनेच करावीत, अशा सूचना केल्या.
शाहूकालिन पुलांसाठी 3 कोटी मागणी
शहरामध्ये शाहूकालिन पुल असून त्यांचे स्ट्रकचरल ऑडीट झाले असून डागडुजीसाठी 3 कोटी 50 लाखांची आवश्यकता असल्याचे शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी सांगितले. राजारामपुरी राजाराम गार्डनसाठी 1 कोटी 74 लाख, शाहू उद्यान 92 लाखांच्या निधीचीही मागणी केली.
सीबीएस जनता बाझार चौक उडानपुलासाठी 100 कोटींची गरज
परिख पूल येथे पावसाळय़ामध्ये सांडपाणी मोठय़ा प्रमाणात साचते. यासाठी परिख पुल विस्तारीकरण, सीबीएस ते पाचबंगला भुयारी मार्ग असे दोन पर्यावावर प्रस्ताव केले असून रेल्वेच्या मंजूरीच्या प्रतिक्षेत आहे. दरम्यान, सीबीएस ते राजारामपुरी जनता बाजार चौक असा उडान पुलाचा आरखडा तयार केला असून 100 कोटींची आवश्यकता असल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले.
पालकमंत्र्यांची गंगावेशसह दोन्ही मोतिबागला तालमींना भेट
ऑलिंपिकमध्ये उत्तम कामगिरी करणारे अधिकाधिक खेळाडू कोल्हापूरात घडावेत. यासाठी क्रीडामंत्र्यांसोबत बैठक घेऊन जिह्यातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा देण्याच्या दृष्टीने ‘विशेष क्रीडा पॅकेज’ मिळवण्यावर भर दिला जाईल, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी येथे सांगितले. त्यांनी शहरातील शाहू विजयी गंगावेश तालीम, मोतीबाग तालीम, न्यू मोतीबाग तालीमला भेट देऊन तेथील मल्ल व प्रशिक्षक व वस्तादांशी संवाद साधला. यावेळी प्रशिक्षकांनी केलेल्या मागणीनुसार केसरकर यांनी प्रशिक्षकांना दरमहा 10 हजार रुपयांचे मानधन दिले जाईल, असे जाहीर केले. तसेच तालमींना मॅट व व्यायामाचे साहित्यासह मूलभूत सुविधा तातडीने दिल्या जातील. यासाठी पहिल्या टप्प्यात निवडक 4 ते 5 तालमींची माहिती घेऊन त्यांना सोयीसुविधा दिल्या जातील., असे सांगितले. यावेळी करवीर विभागाचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे आदी उपस्थित होते. दरम्यान, सर्व तालमींची क्रीडा विभागाच्या अधिकाऱयांनी लवकरात लवकर पाहणी करावी. या पाहणीत जेथे दुरुस्ती करणे आवश्यक आहे, असे दिसून येईल, तेथे तातडीने दुरुस्ती करावी, अशी सूचना केसरकर यांनी अधिकाऱयांना दिल्या.
‘कृषी’ जमिनीसाठी संरक्षक भिंतीचा प्रस्ताव द्या
शेंडा पार्क येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे काम चांगले आहे. पण त्यांच्या जागेला कुंपण नसल्याने शासकीय मालमत्तेचे नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी संपूर्ण जमिनीला संरक्षक कुंपणासाठी प्रस्ताव द्या, अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हाधिकाऱयांना केली. दुपारी साडेचार वाजता त्यांनी 310 कोटींच्या प्रशासकीय इमारतीच्या जागेसाठी शेंडा पार्क येथे पाहणी केली. त्यानंतर विभागीय कृषी संशोधन केंद्रात अधिकाऱयांची बैठक घेतली. डॉ. यादव यांनी शेंडा पार्क कृषी संशोधन केंद्रातील प्रकल्पांची माहिती दिली. संशोधन केंद्रातील वाणांच्या जतनासाठी प्रकल्पाभोवती संरक्षक कुंपणाची गरज असल्याचे कृषी विभागातील अधिकाऱयांनी स्पष्ट केले. पालकमंत्री केसरकर यांनी किती किलोमीटर क्षेत्रासाठी कंपाऊंड हवे, असे विचारले. तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना कृषी संशोधन केंद्रासाठीच्या कंपाऊंड वॉलसाठीचा प्रस्ताव तातडीने मागवून घ्या, अशी सूचना केली. डॉ. सुनील सावंत यांनी स्वागत करून आभार मानले.