Kolhapur Expansion : कोल्हापूर हद्दवाढीचा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. प्रस्तावित हद्दवाडी मध्ये समाविष्ट केलेल्या गावांनी हद्दवाढीला विरोध दर्शविला आहे. हद्दवाढी मध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांनी एकजूट केल्याचा प्रत्यय आज कोल्हापुरात पाहायला मिळाला. कोल्हापूर शहरा नजीक असणाऱ्या उंचगाव या गावाने आज सर्व व्यवहार बंद ठेवत ‘गाव बंद’ आंदोलनाची सुरुवात केली आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने गाव बंद आंदोलनाला सुरुवात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा तिढा सुटण्याऐवजी आणखी गुंतागुंतीचा होत आहे.
कोल्हापूर हद्दवाढ विरोधी कृती समितीने रविवारी बोलावलेल्या बैठकीकडे सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे. कोल्हापूर हद्दवाढीचा निर्णय त्यांना विचारात न घेता घेण्यात येऊ नये, यासाठी विरोधी कृती समितीकडून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे.
हद्दवाढ म्हणजे नेमके काय
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने शहराच्या हद्दवाढीची अधिसूचना काढणे आणि त्या अनुषंगाने महापालिकेने पूर्तता करणे हीच काय ती शहराच्या हद्दवाढीची प्रक्रिया आहे. महापालिका सभागृहाचा ठराव झाला की समाविष्ट होणाऱया गावांची संमती असो वा नसो हा मुद्दा प्रशासकीय दृष्टय़ा गौण मानला जातो. ही गावे पायाभूत सुविधांच्या कारणास्तव न्यायालयात दाद मागू शकतात. राजकारण आडवे आल्याने गावांच्या भावनांवर स्वार होऊन हवा तापवली जाते. पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक आदी शहरांची मागील काही वर्षात किमान तीन ते आठ वेळा हद्दवाढ झाली. कोल्हापुरात मात्र हद्दवाढीच्या गाजराची शेती करण्यात लोकप्रतिनिधी व्यस्त असल्याचे वास्तव आहे.
Previous Articleपरराज्यातील गुंडांचे रॅकेट नष्ट करण्याचे पोलिसांसमोर आव्हान
Next Article हद्दवाढ म्हणजे काय रे भाऊ?









