विन्स हॉस्पीटल परिसरात दर्शन : चार गवे असल्याची प्राथमिक माहिती : वन्यजीव विभागाचे बचाव पथक ऍक्टीव्ह : नागरी वस्तीत गव्यांचा प्रवेश रोखण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी/कोल्हापूर
KOLHAPUR CITY BISON ENTRY : या वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये शहरात गव्याचा थरार शहरवासीयांनी अनुभवला होता. आता शहराच्या सीमेवर गव्यांनी पुन्हा एंट्री केली आहे. बुधवारी महावीर कॉलेजच्या पिछाडीस असणाऱया विन्स हॉस्पिटलच्या परिसरातील ससे यांच्या मळ्य़ाच्या परिसरात चार गव्यांचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांत घबराट पसरली आहे. चार पाच दिवसांपूर्वी प्रयाग चिखली, वडणगे परिसरात दिसलेला गव्याचा कळप पंचगंगा नदीचे पात्र पार करून शहराच्या सीमेवर दाखल झाल्याची शक्यता वन विभागाच्या अधिकाऱयांनी व्यक्त केली. दरम्यान, शहराच्या नागरी वस्तीत या गव्यांनी शिरकाव करू नये, यासाठी वन विभागाच्या बचाव पथकाने नियोजन केले आहे.
चार पाच दिवसांपूर्वी प्रयाग चिखली, वडणगे परिसरात स्थानिक नागरिकांना गव्यांचा कळप दिसला होता. वन विभागाच्या पथकाने या कळपावर वॉच ठेवून तो शहराच्या नागरी वस्तीकडे सरकणार नाही. तो पुन्हा नैसर्गिक अधिवासात कसा जाईल, यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्या दृष्टीने नियोजनही करण्यात आले होते. गावकऱयांनाही गव्यांच्या कळपापासून दूर राहत सावधानता बाळगण्याचे आवाहन केले हेते. दरम्यान, मंगळवारी विन्स हॉस्पिटल परिसरात पंचगंगा नदीच्या पात्राच्या परिसरात असणाऱया ससे पाणंद येथे चार गव्यांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले. या ठिकाणी शेती असलेले जुना बुधवार पेठेतील जयवंत निकम राहतात. त्यांचे शेतातच घर आहे. ते मंगळवारी म्हशींना चरायला घेऊन गेले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास घरी परतत असताना त्यांना गव्यांचा कळप उसाच्या शेतीत चरत असताना दिसला. त्यांनी सावधानतेने म्हशी घेऊन घर गाठले. तीन मोठे गवे आणि एक गव्याचे पिल्लू दिसले, अशी माहिती जयवंत निकम यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. दरम्यान, या परिसरातील शेतीतील गवत कापण्यासाठी लक्षतीर्थ परिसरातील कामगार आले होते. त्यांना गवत कापत असताना गव्यांचा कळप दिसला. त्यांच्या पैकी काही जणांनी गव्यांचे फोटो काढले. काम थांबवून परतल्यानंतर त्यांनी चार नव्हे आठ गवे असल्याची माहिती दिली. त्यामुळे नेमके गवे किती या विषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, वन परिक्षेत्र अधिकारी रमेश कांबळे, वनपाल विजय पाटील यांच्यासह वन्यजीव विभागाच्या बचाव पथकाने घटनास्थळी दाखल होत, गव्यांच्या कळपाने शहराच्या नागरीवस्तीत शिरकाव करू नये, यासाठी नियोजन सुरू केले आहे. रात्री उशिरापर्यंत बचाव पथकातील प्रदीप सुतार, विनायक माळी, अमोल चव्हाण, अलमतीन बांगी यांच्यासह इतर कर्मचारी परिसरात गस्त घालत होते. या पथकाला छत्रपती वाईल्ड लाईफ फौंडेशनचे अशुतोष सूर्यवंशी आणि त्यांचे सहकारी मदत देत होते.
वन्यजीव विभाग अनभिज्ञ
मंगळवारपासून दोन दिवस विन्स हॉस्पिटलच्या परिसरातील ऊसाचय शेतात गव्यांचा कळप आहे, याची चर्चा नागरिक होती. प्रत्यक्ष गवा पाहिलेले शेतकरी आणि गवत कापणारे कामगारही होते. नागरिक चर्चा असताना वन्यजीवन विभागाला शहराच्या सीमेवर पंचगंगा नदी पार करून गव्यांचा कळप दाखल झाल्याची साधी भनकही नव्हती. मंगळवारी चर्चा व्हायरल झाल्यानंतर वन्यजीव विभागाचे अधिकारी आणि पथक व्हॅनसह दाखल झाले. रात्री त्यांचा शोध सुरू होता, तरीही त्यांना कळप मात्र दिसला नाही.
शहर परिसरात गवे येऊ नयेत यासाठी वनविभाग कार्यरत आहे. नैसर्गिक अधिवास सोडून आलेले गवे पुन्हा परतीच्या वाटेवर जातील. मात्र नागरिकांनी गर्दी, कळप असलेल्या परिसरात गर्दी आणि हुल्लडबाजी करू नये, गवे दिसल्यास वनविभागाला कळवावे. –विजय पाटील, वनपाल, करवीर