सदर याचिकेवर येत्या 22 तारखेला सुनावणी होणार आहे
जयसिंगपूर : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जयसिंग महाराज उद्यान येथे उभारण्यात येऊ नये. पुतळा सिटी सर्व्हे नंबर 1251 येथे उभारणेच कायदेशीर ठरेल अशी मांडणी करणारी याचिका दलित समाजातील नागरिकांनी संविधान विश्लेषक अॅड. असीम सरोदे तसेच अॅड. श्रीया आवले, अॅड. योगेश सावंत, अॅड. सिद्धी दिवाण, अॅड. हेमा काटकर व अॅड. सकलेन मुजावर यांच्या मदतीने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे दाखल केली आहे.
सदर याचिकेवर येत्या 22 तारखेला सुनावणी होणार आहे. आंबेडकरवादी कार्यकर्ते विश्वजित कांबळे, स्वाती ससाणे, सुरेश भाटिया, अमित वाघवेकर, आदम मुजावर, शांताराम कांबळे, निखिल केसारे याचिकाकर्ते असलेल्या या याचिकेमध्ये जयसिंगपूर नगरपरिषद, कोल्हापूर पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी कोल्हापूर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच महाराष्ट्र शासनाला प्रतिवादी करण्यात आल्याचे व पुतळ्याला नाही तर प्रस्तावित लोकेशनला विरोध करण्यात आल्याचे अॅड. योगेश सावंत म्हणाले.
आमदार यड्रावकर त्यांच्या राजकीय सोयीनुसार पुतळ्याचे भावनिक राजकारण करीत असल्याने वारंवार पुतळा उभारण्याचे स्थळ बदलतात, पुतळ्यासंदर्भातील 2017 च्या शासन निर्णयाचे पालन न करता एकतर्फी निर्णय घेण्यात येत आहेत, लोकांच्या सहभागातून निर्णय घेण्याची प्रक्रिया डावलण्यात आलेली आहे स्थानिकांची परवानगी घेतलेली नाही.
जयसिंग महाराज उद्यान ही बाग सामान्य माणसांसाठीचे निवांत ठिकाण म्हणून विकसित करण्यावर लक्ष न देता उद्यान उद्धस्त केले जात आहे, सार्वजनिक उपयोगाच्या जागेवर पुतळा बांधता येत नाही, पुतळ्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन झालेले आहे असे आरोप व आक्षेप याचिकेतून नमूद आहेत.
उद्यानाच्या जागेवर डॉ आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात मनाई करावी, अभ्यासिका इत्यादी व पुतळा सर्वे नंबर 1251 वरच उभारा अश्या मुख्य मागण्या याचिकेतून करण्यात आल्याची माहिती अॅड. श्रीया आवले व अॅड. सिद्धी दिवाण यांनी दिली. अॅड. असीम सरोदे म्हणाले की, डॉ. आंबेडकरांचे विचार महत्वाचे न मानता केवळ पुतळ्याला महत्व देणारेराजकारण यामधून उघड होणार आहे.
28 तारखेला बाबासाहेबांच्या पुतळ्याचा आगमन सोहळ्याला स्थगिती द्यावी अशी मागणी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्या.शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर करण्यात येणार आहे.








