खासबाग मैदानात हृद्य सत्कार : पै. बाबा महाडिक यांच्या पुढाकाराने आगळ्य़ा वेगळ्य़ा सोहळ्य़ाचे आयोजन
प्रतिनिधी/कोल्हापूर
कुस्तीला राजाश्रय देणारे, मल्लांचे अन्नदाता म्हणून योगदान देणाऱ्या लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या काळातील दिग्गज मल्लांच्या वंशजांचा आगळा वेगळा सत्कार सोहळा शुक्रवारी पार पडला. शाहूकालीन मल्लांच्या चौथ्या, पाचव्या पिढीतील वारसांनी या सोहळय़ाला हजेरी लावत राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना दिली. विशेष म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेल्या ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदानात सायंकाळी लाल माती आणि मावळत्या सूर्याच्या साक्षीने वारसांच्या गौरवाचा हा सोहळा झाला. पै. बाबा महाडिक यांच्या कल्पनेतून साकारलेला हा सोहळा आगळा वेगळा आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा ठरला.
राजर्षी शाहू स्मृती शताब्दीचे औचित्य साधून कृतज्ञता पर्वात विविध उपक्रमांनी शाहू महाराजांना मानवंदना देण्यात आली. या उपक्रमांत कुस्ती मैदानाचे आयोजनही करण्यात आले. त्याचबरोबर शाहूकालीन मल्लांच्या वारसांना एकत्रित आणून त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. पै. बाबा महाडिक आणि इतिहास अभ्यासक राम यादव ‘शाहूकालिन मल्ल’ या विषयावर एक संदर्भ गंथ तयार करत आहेत. शाहूकाळातील बहुतांश दिग्गज मल्लांची आणि वस्तादांची माहिती नव्या पिढीला या संदर्भ ग्रंथाच्या माध्यमातून पाहण्यास मिळणार आहे. पै. महाडिक यांनी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाकडे शाहू कृतज्ञता पर्वात शाहूकालिन मल्लांच्या वारसांना एकत्रित आणून त्यांचा सत्कार करावा, त्या माध्यमातून शाहूंच्या कुस्तीसंदर्भातील स्मृतींना उजाळा देऊया, अशी संकल्पना मांडली. त्याला होकार देत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी शाहूंच्या खासबाग मैदानात शाहूंच्याच मल्लांच्या वारसांना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. जिल्हा क्रीडाधिकारी डॉ. चंद्रशेखरसाखरे, पै. बाबा महाडिक, इतिहास अभ्यासक राम यादव, गणेश मागुगडे, पै. संग्रामसिंह कांबळे, वरिष्ठ क्रीडाधिकारी सुधाकर जमादार, तालुका क्रीडाधिकारी सचिन चव्हाण, क्रीडाधिकारी बालाजी बरबडे उपस्थित हेते.
या मल्लांच्या वारसांचा झाला सत्कार
शाहू महाराजांचे वस्ताद रावजी सांगावकर-पाटील, गोपाळ जाधव, पठाण वस्ताद उर्फ नारायण कसबेकर, धोंडी कसबेकर (पठाण वस्ताद यांचे सुपुत्र), गणपत शिंदे, शिवाफ्पा बेरड, देवाफ्पा धनगर, गोविंदा कसबेकर, पांडु भोसले, निहाल पैलवान, गोरा ईमाम, बाबुमियाँ, म्हादू गवंडी, बाबू बिरे, व्यंकाफ्पा बुरूड, सखाराम शेंडुरे या सर्व शाहूकालिन मल्लांच्या वारसांचा या सोहळय़ात सत्कार करण्यात आला.
कर्नाटक, पुण्याहून वारस दाखल
सत्कार सोहळय़ाला शिवाफ्पा बेरड, देवाफ्पा धनगर यांचे वंशज कर्नाटकातून आले होते. बाबुमियाँ यांचे वारस पुण्याहून आले होते. गणपत शिंदे यांची वृद्ध मुलगी आली होती. चौथ्या पाचव्या पिढीतील वारसांना एकत्रित आणणारा हा सोहळा हृद्य असा ठरला.
1891 मध्ये झाली होती कुस्ती
नारायण कसबेकर आणि बाबुमियाँ या दोन शाहूकालिन दिग्गज मल्लांत कुस्ती झाली होती. या कुस्तीची त्या काळातील जाहिरातही आज इतिहास अभ्यासकांकडे उपलब्ध आहे. या कुस्तीत लढलेल्या कसबेकर आणि बाबुमियाँ यांचे वारस या सत्कार सोहळय़ात भेटले. सव्वाशे वर्षांपूर्वीच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला.