कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर शहर उत्तर पोट निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजित कदम यांच्यात काटाजोड लढत झाली. शेवटपर्यंत हुरहुर अन् उत्कंठा वाढवणारा निकाल ठरला. अंतीमत: १८ हजार ९०१ मतांनी काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी झाल्या. विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जोरदार जल्लोष केला.
उत्तर विधानसभेच्या पोट निवडणुकीत कोल्हापूरकरांनी तोलून मापूनच मतदान केले होते. मागील २०१९च्या निवडणुकीत ६०.०७ टक्के मतदान झाले होते. यावेळी अंदाजे ६१.१९ टक्के मतदान झाले. कोल्हापूरकरांचा समतोल टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार याबाबत कमालीची उत्सुकता होती. कसबा बावडा, लाईन बझार, अकबर मोहल्ला, लक्ष्मीपूरी, झोपडपट्टी बहुल भागासह पेठांमध्ये काँग्रेसचे पारडे जड राहिले. तर कदमवाडी भोसलेवाडी, नागाळापार्क, ताराबाई पार्क, शाहुपूरी पाचबंगला,आदी उच्चभ्रू परिसरात भाजपच्या उमेदवाराला पसंदी दिसली.
मागील २०१९च्या निवडणुकीत एकूण मतदार २ लाख ८३ हजार ४८० मतदारांपैकी एक लाख ७२ हजार १६८ मतदारांनी मतदान केले होते. 357 मतदान केंद्रावर एकूण 61.19 टक्के मतदान झाले. 2 लाख 91 हजार 798 मतदारांपैकी स्त्री मतदार- 1 लाख 46 हजार 18, पुरुष मतदार- 1 लाख 45 हजार 768, तृतीयपंथी- 12 मतदार होते. 1 लाख 78 हजार 542 मतदान झाले. यमाध्ये स्त्रिया -84 हजार 535 (57.89 टक्के), पुरुष-94 हजार 4 (64.49 टक्के) व इतर-3 एकूण 61.19 टक्के मतदान झाले होते.
यापार्श्वभूमीवर सकाळी आठ वाजता राजाराम कॉलेज परिसरात मतमोजणीला सुरूवात झाली. कसबा बावडा परिसरापासून मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या फेरीत जाधव यांना ४८५६ तर कदम यांना २७१९ मते मिळाली. पहिल्या फेरीतच जाधव यांनी दोन हजार १३७ मतांची निर्णायक आघाडी घेतली. कसबा बावडा लाईन बझार परिसरातील तीसऱ्या फेरी अखेर जाधव यांना सात हजार ५०१ मतांची आघाडी मिळाली. मात्र, चौथी आणि पाचव्या फेरीत कदमवाडी, भोसलेवाडी, जाधववाडी परिसरात सुमारे सातशे मते कदम यांना जादा मिळाली. सहाव्या आणि सातव्या फेरीत सदरबझार, विचारे माळ परिसरात पुन्हा जाधव यांना सुमारे हजार मतांचे मताधिक्य मिळाले. तारबाईपार्क, नागाळपार्क आदी नवव्या फेरीपर्यंत पुन्हा कदम यांना दोनशे मते जादा मिळाली. मात्र, जाधव यांची निर्णायक आघाडी कायम होती. त्यांनतर दहाव्या फेरीत पाचबंगला परिसरात पुन्हा कदम यांना नउशे मताधिक्य मिळाले. साईक्स एक्स्टेशन परिसरात ११ व्या फेरीत शंभर मतांची आघाडी जाधव यांना मिळाली. १२ वी फेरीत राजारामपूरी, शाहूपूरी उदयमनगर, लक्ष्मीपूरी रविवार पेठ आदी परिसरात जाधव यांना एक हजार ३८ जादा मते मिळाली.
अकबर मोहल्ला, शिवाजी चौक, शाहू टॉकिज, महानगर पालिका आदी परिसरातील १३व्या फेरीत १९६४ मतांचे मोठी आघाडी जयश्री जाधव यांनी घेतली. १४व्या फेरीत बुरूड गल्ली, तोरस्कर चौक, टाऊन हॉल परिसरात एक हजार ८७ इतकी जादा मते जाधव यांना मिळाली. सिध्दार्थ नगर, जुना बुधवार या १५व्या फेरीत जाधव यांना १७३२ ची आघाडी मिळाली. १६ व्या फेरीत खोल खंडोबा आणि शुक्रवारपेठ परिसरात सत्यजित कदम यांना २०९ मतांची आघाडी मिळाली. बाबूजमाल, गंगावेश, उत्तरेश्वरपेठ, दुधाळी, या परिसरातील १७ व्या फेरी अखेर सत्यजित कदम यांना पुन्हा ६९३ मतांची आघाडी मिळाली. १८व्या फेरीतील मिराबाग, संध्यामठ, फिरंगाई परिसरात जयश्री जाधव यांनी पुन्हा मुसंडी मारत ७६९ मतांची आघाडी घेतली. गंजीमाळ, फिरंगाई परिसरात १९व्या फेरीत २८५ मते जादा मिळाली. मंगळवारपेठ, पद्माळा, संभाजीनगर परिसरातील २०व्या फेरीत १२९२ मतांनी पुन्हा निर्णायक आघाडी जयश्री जाधव यांनी घेतली. वरुणतिर्थ आणि भवानीमंडप परिसरात २१० असे अत्यल्प मतांची आघाडी सत्यजित कदम यांना मिळाली. दुपारी साडेबारा वाजता २१ व्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांना १५ हजार २२२ मतांची निर्णायक आघाडी घेतली होती. यानंतर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरात जोरदार जल्लोष करत गुलालाची उधळण करण्यास सुरूवात केली.
खासबाग, मिरजकर तिकटी, वरुणतिर्थ या परिसरातील २२ व्या फेरीअखेर जयश्री जाधव यांचे मताधिक्य ३०३ असे थोडक्यात वाढून ते १५ हजार ५२५ इतके झाले. अजून चार फेरीतील २३ हजार ७०५ मते मोजणी बाकी असतानाच कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष सुरू केला. ससूरबाग, साठमारी, मंगळवारपेठ बुध चार येथील परिसरातील २३ व्याफेरी अखेर ८०६ जादा मते घेवून १६ हजार ३३१ मतांची आघाडी घेतली. मंगळवारपेठ, यादवनगर, शाहूमिल परिसरातील २४व्या फेरीत २ हजार ५०७ मतांची मोठी आघाडी जाधव यांना मिळाली. एकूण १८ हजार ८३८ मतांची आघाडी जयश्री जाधव यांना मिळाली. तोरणानगर, राजारामपूरीपूर्व भागातील २५ व्या फेरीत सत्यजित कदम यांना १९४ मताधिक्य मिळाले. शेवटच्या २६व्या तोरणानगर, शास्त्रीनगर, जवाहरनगर परिसरात १५६ मताधिक्य जाधव यांनी घेतले. पोस्टल मतांमध्ये १०१ मताधिक्य घेवून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी एकूण १८ हजार १०१ मतांनी विजयी झाल्या. यानंतर शहरभर रॅली काढून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.