औरंगजेब आणि टिपू सुलतानाचे स्टेटस ठेवल्यामुळे गेले कालपासून कोल्हापूरातील वातावरण तणावपुर्ण असतानाच आज हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. शहरात काही ठिकाणी दुकाने फोडल्यानंतर वातावरण तंग झाल्यावर प्रशासनाला आणखी पोलीस कुमक मागवून आंदोलकांना पांगवण्यास यश आले आहे. सकाळच्या परिस्थितीपेक्षा आता वातावरण निवळले आहे.
कोल्हापूर बंदच्या हाकेनंतर आज सकाळी कोल्हापूरातील वातावरण आणखीच चिघळले. पापाची तिकटी, चप्पल लाईन, महानगरपालिका परिसरात आंदोलकांनी एकत्र जमून कालच्या घटनेचा निषेध केला. कोल्हापुर महानगरपालिका चौकातील रिक्षा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी फोडून उलटवली. तर चप्पल लाईनला असलेले हॉलिवूड शूजचे दुकानही फोडण्यात आले.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असतानाच प्रशासनाने अधिक पोलिस कुमक मागवून आंदोलकांना पांगवण्यात यश मिळवले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्याचबरोबर अश्रुधुराचा वापर करून गर्दीला पांगवण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याचबरोबर परिस्थिती नियंत्रणात आणण्य़ासाठी पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित हे रस्त्यावर उतरले आहेत. तसेच येत्या काही काळासाठी जिल्ह्यातील इंटरनेट बंद करण्याचा विचार प्रशासन विचार करत असल्याचे सांगण्यात आले आहे.








