कोल्हापूरातील ऐतिहासिक खासबाग मैदानाची भिंत पडली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली आहे.
अश्विनी आनंदा यादव (वय ५९, रा. भोसलेवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर संध्या तेली ( वय २८, रा. वडणगे) असे जखमी महिलेचे नाव आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी, गेल्या काही दिवसापासून कोल्हापूरात मुसळदार पाऊस पडत आहेत. त्यामुळे शहरातील अत्यंत जुन्या अशा काही वास्तूपैकी एक असलेली खासबाग मैदानाची मागील बाजू आज ढासळली. या मैदानाच्या बाजूलाच महिलांचे शौचालय असून, भिंत पडल्यानंतर शौचालयात दोन महिला अडकल्याची माहीती समोर आली होती. प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचावकार्य राबवले. महिलांना तात्काळ बाहेर काढून त्यांना हॉस्पिटलमध्ये हालवले. त्यामधील एका महिलेचा मृत्यू झाला. तर एक महिला जखमी आहे. भिंतीच्या बाजूला लावलेल्या चारचाकी गाड्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.









