Kolhapur News : सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर कोल्हापुरात एकच दंगल उसळली होती. या घटनेला आठवडा पूर्ण होत नाही तोपर्यंत काल कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरातील एका 38 वर्षीय तरुणाने टिपू सुलतानचे व्हाट्सअप स्टेटस ठेवल्याने कागल शहरात रात्री पुन्हा तणाव निर्माण झाला. हिंदुत्ववादी संघटनांनी तरुणाला अटक करण्याची मागणी केली तसेच हिंदुत्ववादी संघटनांकडून कागल बंदची हाक देण्यात आली होती. मात्र पोलिसांनी सदर तरुणाला ताब्यात घेत मध्यस्थी करून बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे.यामुळे सध्या कागल शहरात तणावपूर्ण शांतता असून चौकाचौकांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती कागल पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली.
कागल शहर बंदची हाक
राजर्षी शाहू महाराजांची जनक भुमी असलेल्या कागल शहरात असा प्रकार घडल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या आणि संशयताला त्वरित ताब्यात घेण्याची मागणी पोलिसांकडे केली जात होती पोलिसांनी देखील याची तत्काळ दखल घेत संशयताला ताब्यात घेतले यानंतरही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी कागल शहर बंद करण्याचे आवाहन केले.मात्र पोलिसांनी रात्री बारा वाजता बैठक घेत मध्यस्थी करून हा बंद मागे घेण्याचे आवाहन केले.पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कागल बंदची देण्यात आलेली हाक मागे घेण्यात आली.
सकाळपासून सर्व व्यवहार सुरळीत
मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत झालेल्या बैठकीनंतर शहरातील सर्व संघटनांनी कागल शहर बंद करणार नसल्याचे स्पष्ट केले मात्र सोशल मीडियावर सकाळी साडेनऊ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमण्याचे आवाहन करण्यात आले होते.मात्र पोलिसांनी शहरातील मुख्य चौकांमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करत एकत्र जमण्यासाठी पोलिसांनी मज्जाव केल्याने शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
उद्या मुख्यमंत्री कोल्हापुरात
आठवड्या भरापूर्वीच कोल्हापुरात मोठे दंगल उसळली होती यानंतर कोल्हापूर काही काळ शांत झाले मात्र कागलमध्ये घडलेल्या या प्रकरणामुळे पुन्हा तणाव निर्माण होतो का अशी शक्यता निर्माण झाली असून उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापुरात येणार आहेत शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी ते कोल्हापुरात हजेरी लावणार असून तपोवन मैदानात हा कार्यक्रम पार पडणार असल्याने पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पडली आहे.








