कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून या दिवाळीला (गोकुळ) दूध उत्पादकांना म्हैस दूधास सरासरी प्रतिलिटर २ रुपये ८० पैसे व गाय दूधास सरासरी प्रतिलिटर १ रुपये ८० पैसे याप्रमाणे दूध दर वाटण्यास येणार आहे. दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळचा कणा आहे. गोकुळ दूध संघामार्फत सातत्याने दूध उत्पादक सभासदांच्या हिताच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जातात. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही म्हैस व गाय दूध दर फरकापोटी १०१ कोटी ३४ लाख रुपये इतकी रक्कम प्राथमिक दूध संस्थाच्या बँकेतील खात्यावर दि. २३ ऑक्टोबर २०२३ इ.रोजी जमा करण्यात येणार असल्याची माहीती गोकुळचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी म्हटले आहे.
आपल्या प्रसिद्धी पत्रकात माहीती देताना गोकुळच्या अध्यक्षांनी, आर्थिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये दि.०१/०४/२०२२ ते ३१/०३/२०२३ या कालावधीत गोकुळला पुरवठा केलेल्या म्हैस दूधास सरासरी प्रतिलिटर २ रुपये ८० पैसे व गाय दूधास सरासरी प्रतिलिटर १ रुपये ८० पैसे याप्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध दर फरक देण्यात येणार आहे. यापैकी प्रतिलिटर ०.५५ पैसे प्रमाणे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्ससाठी गोकुळकडे जमा करण्यात येणार आहेत. दूध उत्पादकाना निव्वळ प्रतिलिटर म्हैस दुधास २ रुपये २५ पैसे व गाय दुधास प्रतिलिटर १ रुपये २५ पैसे अंतिम दूध दर फरक देण्यात येईल. अशी माहीती दिली.
तसेच, यावर्षी संघाने म्हैस दूधाकरीता ५६ कोटी ३८ लाख १९ हजार रुपये तर गाय दूधाकरीता २७ कोटी ९९ लाख ८२ हजार रूपये इतका दूध दर फरक व दर फरकावर ६ % प्रमाणे होणारे व्याज ३ कोटी ३१ लाख ४६ हजार व डिंबेचर व्याज ७ % प्रमाणे ७ कोटी १२ लाख ९५ हजार रूपये व शेअर्स भांडवलावरती ११% प्रमाणे डिव्हिडंड ६ कोटी ५० लाख ९२ हजार रूपये असे एकूण १०१ कोटी ३४ लाख रूपये इतकी रक्कम स्वतंत्र दूध बिलातून दूध संस्थाच्या खात्यावर बँकेत जमा केली जाणार आहे. दूध उत्पादक सभासदांसाठी सणाच्या अगोदर गोकुळकडून दिवाळीची गोड भेट आहे. अशी भावना चेअरमन अरुण डोंगळे यांनी व्यक्त केली.
या दर फरकाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सीमा भागातील गोकुळच्या जवळजवळ ५, २०० दूध संस्थांच्या ५ लाख ५० हजार दूध उत्पादक सभासदांना होणार आहे. दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या एकूण १०१ कोटी ३४ लाख रुपये अंतिम दूध दर फरका व्यतिरिक्त गोकुळने या आर्थिक वर्षामध्ये जवळजवळ ३८ कोटी रुपये पशुवैद्यकीय उपचार, कृत्रिम रेतन, वैरण विकास, मायक्रोट्रेनिंग, दूध संस्था इमारत बांधकाम अनुदान यासारख्या उपक्रमावर आणि सेवासुविधावरती खर्च केले आहे. गोकुळची सन २०२२-२३ मध्ये ३,४२९ कोटी रुपये वार्षिक उलाढाल झाली असल्याचेही त्यांनी नमुद केले आहे.