भाजपचा आत्मविश्वास आता गेला असून त्यामुळेच त्यांच्यावर बहूमत असताना पक्ष फोडण्याची वेळ येत आहे अशी टिका काँग्रेस नेते आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. तसेच या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 400 पारचा दावा करत असला तरी 400 पार होणार की 200 ही पार होणार नाही ते जनता ठरवेल असा टोलाही त्यांनी लगावला.
आज कोल्हापूरात जिल्ह्यातील काँग्रेसच्या आमदार आणि शहरातील नगरसेवकांनी चित्रपट गृहात जाऊन महात्मा फुले यांच्या जिवनावरील सत्यशोधक हा चित्रपट पाहीला. चित्रपट गृहाबाहेर माध्यमाशी बोलताना सतेज पाटील यांनी चित्रपटाची स्तुती केली. हा चित्रपट निश्चितच समाजात जागृती निर्माण करेल त्यामुळे सर्वांनी हा चित्रपट पहावा. सध्याच्या गढूळ राजकीय वातावरणात हा चित्रपट निश्चितच समाजाला दिशादर्शक ठरेल. एका बाजूला द काश्मीर फाइल्स सारखा प्रोफोगोंडा चित्रपट काढून मतांचा ध्रुवीकरण केलं जातं. कोल्हापुरातही पोटनिवडणुकीत भाजपकडून हा प्रयत्न झाला होता मात्र कोल्हापूरकरांनी हा प्रयत्न हाणून पाडला असे त्यांनी म्हटले आहे.
आमदार सतेज पाटील यांना माजी गृहमंत्री आलेल्या भाजपच्या ऑफर विषयी प्रतिक्रिया विचारली. यावेळी राजकिय भाष्य करताना भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टिका केली. ते म्हणाले, “भाजपचा आत्मविश्वास गेलेला आहे. आज तुमच्याकडे बहुमत असताना पक्ष फोडण्याची वेळ तुमच्यावर का येते ? तुम्ही तुमची प्रतिमा चांगली असेल तर नऊ वर्षे केलेल्या कामांवरच तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे. इतरांना फोडण्याचं कोणतेही कारण नाही. सुशील कुमार शिंदे आणि त्यांचं कुटुंबीय गेली 50 वर्षे काँग्रेस सोबत आहे. त्यांनी यापूर्वी सुद्धा आपलं मत स्पष्ट केलेला आहे. सुशील कुमार शिंदे यांना टार्गेट केलं जात आहे आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. काँग्रेस एकसंघ आहे आणि ती पुढे देखील एकसंघ राहील.” असे ते म्हणाले.
राजू शेट्टी यांच्या महाविकास आघाडीच्या प्रवेशावर भाष्य करताना सतेज पाटील म्हणाले, “राजू शेट्टींना सोबत घ्या अशा सूचना वारंवार वरिष्ठांना केल्या आहेत. काही दिवसात चित्र स्पष्ट होईल. त्याच्याशी बोलणे देखील होते यांना महाविकास आघाडी सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरूच आहे. या विषयावर त्यांच्यासोबत बोलणे सुरूच आहे.”
भाजपच्या 400 पारच्या दाव्यावर भाष्य करताना ते म्हणाले, “या निवडणुकीत भाजप 400 पार होणार की 200 पार ही होणार नाही ते जनताच ठरवेल. 2024 ची निवडणूक ही भाजप विरुद्ध जनता अशी असेल.” असा दावा त्यांनी केला.








