मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचा विश्वास
प्रतिनिधी/ बेळगाव
विधान परिषदेच्या चारही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होणार, असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बोलून दाखविला. निवडणूक प्रचारासाठी शनिवारी ते बेळगाव दौऱयावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील विश्वास व्यक्त केला.
सकाळी बेळगावला आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केएलई संस्थेचे चेअरमन व माजी खासदार प्रभाकर कोरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर खासगी हॉटेलमध्ये पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. जेएनएमसी डॉ. व्ही. एस. जिरगे सभागृहात निवडणूक प्रचाराची सभा झाली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आपण बेळगाव, विजापूर, बागलकोट आदी सर्व जिल्हय़ांतून माहिती घेतली आहे. आपल्या पक्षाचे उमेदवार अरुण शहापूर व हणमंत निराणी यांचा विजय निश्चित आहे. राज्यसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीतही आपल्याच पक्षाचे उमेदवार विजयी होतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी खासदार प्रभाकर कोरे, पालकमंत्री गोविंद कारजोळ, मंत्री उमेश कत्ती, शशिकला जोल्ले, खासदार मंगला अंगडी, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, भाजपचे राज्य सरचिटणीस रवीकुमार, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यासह पक्षाचे दोन्ही उमेदवार व इतर नेते उपस्थित होते.
आपल्या या बेळगाव दौऱयात मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस व निजदवर राजकीय टीकाही केली. काँग्रेस म्हणते निजद ही भाजपची बी टीम आहे तर निजद म्हणते काँग्रेस भाजपची बी टीम आहे. याचाच अर्थ भाजप ए टीम आहे हे त्यांनी मान्य केले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.









