वारणानगर / दिलीप पाटील
Kolhapur News : अख्खा जून महिना संपत आला तरी पावसाने ओढ दिली ,विहिरींनी तळ गाठला आहे.त्यामुळे शिवारातील पिकांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे आधीच शेतकरी मेटाकुटीला आला आहे.त्यातच गव्यांनी आपला अधिवास सोडून नागरी वसतीकडे आपला मोर्चा वळवला आहे. गेल्या जून-जुलै पासून जपलेल्या आडसाली ऊसापासून नोव्हेंबर ते जानेवारी पर्यंत लागण केलेल्या ऊसपिकांची पाण्याअभावी वाईट परिस्थिती झाली आहे. मात्र पाऊस सुरु होईपर्यंत तो कसाबसा टिकवून ठेवण्यासाठी धडपड करणाऱ्या केखले येथील शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसपिकांची गेल्या काही दिवसांपासून गव्यांनी अक्षरशः धुळधान केली आहे. या परिसरात दहा-बारा शेतकऱ्यांच्या चाळीस एकरांहून अधिक क्षेत्रातील ऊसपिकात वीस ते पंचवीस गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला असल्याचे पन्हाळा तालुका कृषी सल्लागार समिती अध्यक्ष जयवंत मगदूम यांनी सांगितले.
केखले शिवारातील जोतिबा डोंगराच्या शेजारच्या गणेश बाग परिसरात गव्यांचा कळप असून , केखले येथील रमेश पाटील, आनंदराव मगदूम, रामदास मगदूम, प्रविण पाटील, उत्तम पाटील, संजय पाटील, बाबुराव पाटील, संपत शिंदे, दिलीप पाटील आदी शेतकऱ्यांचा चाळीस एकरांहून जास्त क्षेत्रातील ऊसपीकाचा या गव्यांच्या कळपाने विध्वंस केला असल्याचे त्यांनी “तरुण भारत संवाद” शी बोलताना सांगितले.
मात्र अद्याप वनविभागाने अथवा अन्य शासकीय यत्रणेने याची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. या वन्य प्राण्यांचा बदोबस्त अगर नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. संबंधित शासकीय यंत्रणेने त्वरीत या घटनेची दखल घेऊन नुकसान बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे.









