यावर्षी सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
भोगावती / प्रतिनिधी
भोगावती सहकारी साखर कारखान्याने गेल्या ऊसगळीत हंगामातील वाढीव दरासह संपूर्ण ऊस बिले ऊस उत्पादकांना वेळेत देणारा भोगावती हा राज्यातील पहिला साखर कारखाना ठरला आहे. त्यामुळे यावर्षीच्या ऊस गळीत हंगामात सहा लाख टनावर ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी सर्वांनी आपला संपूर्ण ऊस पुरवठा करून कारखान्यास सहकार्य करावे.असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष व आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांनी मंगळवारी भोगावती येथे केले.
शाहूनगर परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या मिलरोलरचे पूजन जेष्ठ संचालक व राष्ट्रीय काँग्रेसचे राधानगरी तालुकाध्यक्ष हिंदूराव चौगले यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी आमदार पाटील अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी जेष्ठ संचालक कृष्णराव किरुळकर, उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल पाटील सडोलीकर यांच्यासह सर्व संचालक मंडळाच्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या ऊसगळीत हंगामात गाळप केलेल्या संपूर्ण उसाची सर्व बिले वाढीव दरासह देणारा भोगावती हा राज्यातील पहिला साखर कारखाना ठरला आहे.कारण अत्यंत काटकसरीचा व पारदर्शक कारभार करून ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न सातत्याने केला आहे.तसेच आगामी काळातही आम्ही यामध्ये कोठेही कमी पडणार नाही.असे अभिवचन आमदार श्री पाटील यांनी यावेळी बोलताना दिले.तर यावर्षीच्या ऊसगळीत हंगामात जास्तीत जास्त ऊस गाळप केल्यास सर्वांच्याच जास्त फायदयाचे आहे.त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपला संपुर्ण ऊस पुरवठा करून कारखान्याला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी बोलताना उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलकर यांनी कारखान्याचे सभासद व कर्मचाऱ्यांचे सर्वांगीण हित जोपासून आम्ही चांगला कारभार करीत आहे.यावर्षीच्या ऊसगळीत हंगामात सर्व शेतकऱ्यांनी कारखान्याला संपूर्ण ऊस पाठविण्याची गरज आहे.कारण जास्तीत जास्त ऊसगाळप केले तरच कमीत कमी उत्पादन खर्च येतो.त्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करावे.स्वागत व सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील यांनी केले.तर प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी आभार मानले.









