प्रतिनिधी/ गगनबावडा
bhavli dhabdhaba gaganbawada : ऑगस्ट अखेर जवळ आला तरी गगनबावडा तालुक्यात पावसाचा जोर वाढताच आहे.मुख्य रस्त्याला लागून असलेल्या बावेली येथील धबधब्याखाली पर्यटकांची गर्दी वाढत आहे.स्थानिक युवकांनी मार्ग काढल्याने ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
पूर्वेला पांडवकालीन किल्ला, तर पश्चिमेला मोरजाई पठार असा ऐतिहासिक वारसा लाभलेले बावेली, हे धुंदवडे खोरीतील प्रमुख गांव आहे.येथे पावसाचा जोर वाढताच आहे. डोंगररांगात अनेक धबधबे ओसंडून वाहत आहेत.लक्ष्मी ओढ्य़ावरील धबधबा व बाजारी ओढ्य़ाचा धबधबा हे त्यापैकीच होत. घोरपडीच्या कड्य़ावरुन कोसळणारा बावेली धबधबा पर्यटकांना भूरळ घालत आहे.बावेली येथील आदर्श युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी झाडी, झुडपे बाजूला केली, परिसर स्वच्छ केला. प्रमुख रस्त्याकडेला असलेल्या या धबधब्याखाली पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. गगनबावडाहून राधानगरी कडे जाताना पर्यटकांना आणखी एका नरनरम्य ठिकाणाची चाहूल लागली आहे.