सलग दुसऱ्या वर्षी पुरस्कार मिळवणारा देशातील पहिला साखर कारखाना
सरवडे प्रतिनिधी
बिद्री ( ता. कागल ) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याला को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यावतीने देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट को-जनरेशन पॉवर प्लांटचा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथे को-जन इंडियाचे संस्थापक ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील व संचालक मंडळाने स्विकारला.
या कार्यक्रमात राज्यभरातून आलेल्या प्रमुख नेतेमंडळी आणि साखर उद्योगातील तज्ज्ञांनी अध्यक्ष के. पी. यांच्याकडून कारखान्याने राबविलेल्या उपक्रमांची माहिती घेऊन कौतुक केले. राज्य पुरस्कारांपाठोपाठ आता राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळवून ‘ बिद्री ‘ ने राज्याचे नाव देशपातळीवर पोहचविल्याचे गौरवोदगार काढले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, सहवीज प्रकल्पाला विरोध होऊनही सर्वांच्या सहकार्याने हा प्रकल्प यशस्वी करुन दाखवला. या प्रकल्पाला गेल्यावर्षी देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा तर यंदा विशेष श्रेणीचा पुरस्कार मिळाला. यामुळे या प्रकल्पाच्या यशस्वितेवर शिक्कामोर्तब झाले असून हा पुरस्कार ऊस उत्पादक सभासद आणि कारखान्यात राबणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना समर्पित केला आहे.
यावेळी को-जन इंडियाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे संयुक्त सचिव दिनेश जगदाळे, नरेंद्र मोहन, सुभाष कुमार व जनरल मॅनेजर संजय खताळ, कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक प्रविणसिंह पाटील, बाबासाहेब पाटील, प्रविण भोसले, राजेंद्र पाटील, धनाजीराव देसाई, श्रीपती पाटील, उमेश भोईटे, एकनाथ पाटील, मधुकर देसाई, धोंडीराम मगदूम, के.ना. पाटील, अशोक कांबळे, युवराज वारके, प्रदिप पाटील, सुनिलराज सुर्यवंशी, विकास पाटील, कार्यकारी संचालक के. एस. चौगुले, सेक्रेटरी एस. जी. किल्लेदार, चिफ अकाउंटंट एस. ए. कुलकर्णी, को-जन मॅनेजर व्ही. के. मिरजी, प्रोजेक्ट मॅनेजर महेश सलगर आदी उपस्थित होते.
“एका बाजूला सहकारी साखर कारखानदारी अडचणीत असताना बिद्रीने सहवीज प्रकल्प आदर्शवत चालवत तो अन्य कारखान्यांसमोर रोल मॉडेल म्हणून ठेवला आहे. सहवीज सोबतच भविष्यात डिस्टीलरी प्रकल्पही आपण यशस्वी करुन दाखवणार असून सभासदांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न कारखाना संचालक मंडळ करेल. या पुरस्कारात श्रमजीवी घटकाचे योगदान महत्वपूर्ण असून त्या सर्वांप्रती हा पुरस्कार संचालक मंडळ अर्पण करत आहे. ”
माजी आम. के. पी. पाटील- अध्यक्ष, बिद्री साखर कारखाना









