संजीव खाडे, कोल्हापूर
2014 मध्ये सारा देश मोदी लाटेवर स्वार झाला असताना कोल्हापूर जिल्हय़ातून मात्र राष्ट्रवादीच्या घडय़ाळ चिन्हावर धनंजय महाडिक विजयी झाले,लोकसभेत गेले.कोल्हापूरच्या विकासासाठी धडपडणाऱ्या महाडिकांनी महापुराच्या काळात पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली जात असल्याने कोल्हापूर शहराचा राज्याशी, देशाशी तुटणारा संबंध आणि त्यामुळे होणारे आर्थिक आणि इतर नुकसान यावर लक्ष केंद्रीत करून या सर्व गोष्टी टाळण्यासाठी 2016 मध्ये बास्केटब्रिज उभारण्याची संकल्पना पुढे आणली. पण जिल्ह्य़ातील राजकारण, विरोधाला विरोध आणि इतर कारणांनी आलेल्या अडथळ्यामुळे निधी मंजूर झालेला बास्केटब्रिज प्रकल्प मागे पडला. 2019 मध्ये महाडिक लोकसभेला पराभूत झाल्यानंतर तर विरोधकांकडून बास्केटब्रिज बास्केटमध्ये घातल्याच्या वल्गनाही झाल्या.पण नियतीच्या मनातच कोल्हापूरकारांसाठी बास्केटब्रिज व्हावा,अशी कदाचित इच्छा होती. 11 जून 2022 रोजी धनंजय महाडिक भाजपकडून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले,आणि त्यानंतर बासनात गेलेला बास्केटब्रिजचा प्रकल्प पुन्हा एकादा बाहेर आला. आज त्याचे भूमीपूजन होते आहे. ते देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते.
2016 मध्ये खासदार महाडिक यांनी महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बास्केटब्रिजचा प्रकल्प स्वतःच्या ताकदीवर केंद्रात भाजपचे सरकार असतानाही मंजूर करून आणला.त्यासाठी आवश्यक असणारा पाठपुरावा त्यांनी पॉवरपाईंट प्रेझेंटेशनसह केंद्र सरकारपुढे मांडला. त्यांना यश आले. 176 कोटी रूपये केंद्राने मंजूरही केले.निधी संबंधित विभागाकडे वर्गही झाला. दरम्यानच्या काळात भूसंपादन व इतर तांत्रिक अडथळ्यांमुळे प्रकल्प प्रत्यक्षात काम सुरू होण्यापासून थांबला. दरम्यान 2019 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार महाडिक पराभूत झाले. निवडून आलेल्या खासदार संजय मंडलिक यांनी बास्केटब्रिज बास्केटमध्ये टाकल्याचे सुतोवाच केले. महाडिक यांचा पराभव आणि खासदार मंडलिक यांचा विरोध यामुळे बास्केटब्रिज बासनात गेला असेच वातावरण झाले.
दरम्यानच्या काळात महाडिक भाजपवासी झाले.त्यानंतर 2019 आणि 2021 या वर्षी पंचगंगेला महापूर आला. कोल्हापूर शहराला महापुराचा विळखा पडला.पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेल्याने आठ दहा दिवस कोल्हापूरचा संपर्क देश,राज्याशी तुटला.आर्थिक हानी झाली.त्यावेळी महाडिक यांच्या संकल्पनेतून साकारला जाणारा बास्केटब्रिज असता तर? असा प्रश्न उपस्थित झाला.बास्केटब्रिजचे महत्वही अधोरेखित झाले.दरम्यान, 2021 च्या महापुरानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार,विजय देवणे बास्केटब्रिजला मंजुरी नाही,टेंडरलाही मंजुरीच नाही,असे आरोप केले.आरोपामागच्या राजकारणाची चर्चाही त्यावेळी रंगली.पण महाडिक यांनी पत्रकार परिषद घेऊन बास्केटब्रिजच्या मंजुरीची,निधी वर्ग झाल्याची कागदपत्रेच सादर केली.त्यामुळे आरोप बिनबुडाचे ठरले.
दरम्यान,भाजपमध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते,साखर तज्ञ म्हणून असलेले महाडिक 11 जून 2022 रोजी राज्यसभेवर निवडून गेले.त्यांनी खासदार होताच बास्केटब्रिज साकारणारच,अशी घोषणा नव्हे पुनरूच्चार केला.तातडीने पाठपुरावाही सुरू केला.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधला.आज गडकरीसाहेबांच्या हस्तेच बास्केटब्रिजचे भूमीपूजन होते आहे.नियती खेळ वेगळा असतो असे म्हणतात.11 जून 2022 रोजी महाडिक यांची राज्यसभेवर निवड होणे,ती निवड होताना त्यांनी आपल्याच कोल्हापूरच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांना पराभूत करणे, बास्केटब्रिज बास्केटमध्ये घातला असे म्हणणारे खासदार संजय मंडलिक आज राज्यातील सत्तांतरानंतर (बदलेल्या राजकारणामुळे-शिंदे गट-भाजप युती) महाडिक यांच्याबरोबर असणे, या सर्व गोष्टी घडत गेल्या.बास्केटब्रिज कोल्हापूरच्या विकासासाठी व्हावा,यासाठी नियतीचे कदाचित हे सारे घडवून तर आणले नाही,असे काहीसे म्हणावे, असे घटनाक्रम चक्रावरणारे निश्चितच आहेत.
Previous Articleहवाईदलाची तीन विमानं दुर्घटनाग्रस्त
Next Article दौंड हत्याकांडातील पुरावे पोलिसांकडून हस्तगत









