भरपावसात 6 किमी स्केटिंग : 90 मीटरच्या ट्रकवर 41 मिनिटांचा मारल्या 72 फेऱ्या
प्रतिनिधी/कोल्हापूर
तिच वय अवघं 3 वर्षे 10 महिने. पण याच वयात तीने सारे कोल्हापूर चकित होईल, अशी धमक दाखवून दिली. तीने रेडय़ाची टक्कर येथील वि. ख. खांडेकर स्केटिंग ट्रकवर जोरदार पावसाच्या सरी झेलत 6 किलो मीटर इतके आंतर होईल, असे स्केटिंग करुन भारतामध्ये नव्या विक्रमांची नोंद केली. अतिशय अवघड असलेल्या प्रोफेशनल इनलाईन स्केटिंगद्वारे तीने विक्रमाला गवसणी घालताना 90 मीटरच्या ट्रकवर 72 राऊंड मारले. केवळ 41 मिनिटांची वेळ पूर्ण करुन तीने विक्रमाला गवसणी घातली. आराध्या पद्मराज पाटील (रा. शिवाजी विद्यापीठ परिसर) असे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या चिमुरडीचे नाव आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून स्केटिंगचे धडे घेत असलेल्या आराध्याला विक्रम म्हणजे काय याची माहिती नव्हती. मात्र आई श्रीदेवी व वडील पद्मराज पाटील यांनी तिला प्रोत्साहन देत स्केटिंग ट्रकवर नेले. एस. के. रोलर स्केटिंग ऍपॅडमीचे प्रशिक्षक सुहास कारेकर यांनी लाडीबुडीने लावून तिच्या पायात प्रोफेशनल इनलाईन स्केटिंग घातले. आधार देत देत फेऱयाही मारायला शिकवले. स्केटिंग करताना ती घाबरत नसल्याचे पाहून आता तूला मोठे आंतर स्केटिंग करुन विक्रम करायचा आहे, असे सांगितले. तीनेही प्रशिक्षक कारेकर यांनी दिलेल्या टिप्सनुसार सराव सुरु केला. तिच्यातील धमक पाहून आई-वडीलांनी विक्रमांचे नियाजेन केले.
गेल्या 10 दिवसांत जोमाने सराव करुन ती विक्रमासाठी सज्जही झाली होती. पण विक्रमासाठी स्केटिंगला सुरुवात करताना पाऊस सुरु झाला. पण त्याची तमा न बाळगता तीने ट्रकवर स्केटिंगला सुरु केली. केवळ 41 मिनिटात 6 किलो मीटरचे आंतर स्केटिंग करुन तीने उपस्थितांची वाहवा मिळवली. ग्लोबल जिनिअस रेकॉर्डचे सचिव संजय जाधव (सोलापूर) यांनी स्केटिंगचे परिक्षण करुन आराध्याने विक्रम प्रस्थापित केल्याची घोषणा करताच फटाके फोडून तीचे कोडकौतुक केले. यानंतर उद्योजक सत्यजित जाधव यांच्या हस्ते तिला ग्लोबल जिनिअसची ट्रॉफी, प्रमाणपत्र व पदक देऊन गौरवले. तसेच एस. के. ऍपॅडमीचे अध्यक्ष भुपाल शेटे यांच्या हस्ते तिचा सत्कारही केला. यावेळी भारतीय जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील, बेळगाव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पंकज पाटील, जमखंडी साखर कारखान्याचे डॉ. बाळासाहेब पाटील, प्राचार्य महेश व्यासमठ, समीर कुलकर्णी, सुनील देशपांडे आदी उपस्थित होते.









