विजेच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज : सर्वांनी खबरदारी घेण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन
ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाराष्ट्रात दोन दिवसात मान्सूनचे आगमन होणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविलेल्या असताना कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि आजरा तालुक्यांना जिल्हा प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. काही वेळातच चंदगड आणि आजरा तालुक्यात विजेच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दोन्ही तालुक्यातील नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.
राज्यात दोन दिवसात मान्सूनचे आगमन
केरळमध्ये दाखल झालेला मान्सून पुढच्या दोन दिवसांत कोकणात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. एरवी ७ जूनला महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यावर्षी तीन-चार दिवस आधीच कोकणात दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. केरळपासून (keral) नंतर कर्नाटकपर्यंत (karnatak) पोहोचलेल्या मान्सूनच्या पुढच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे दोन दिवसांत तो गोवा आणि दक्षिण कोकणात दाखल होऊ शकतो, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. असं असलं तरी मुंबईकरांना मात्र आणखी आठवडाभर मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मान्सून 10 जूननंतरच मुंबईत येईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.