प्रतिनिधी/कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी डॉ. अजितसिंह जाधव यांची निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ते डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठात परीक्षा संचालक म्हणून गेल्या दीड वर्षापासून कार्यरत होते. त्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामाची दखल घेत त्यांची परीक्षा संचालक म्हणून निवड केली आहे. येत्या काही दिवसात शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून त्यांच्याकडे परीक्षा संचालकांचा पदभार सोपवला जाणार आहे.
शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांचा कालावधी संपल्यापासून या पदावर गेल्या तीन वर्षापासून गजानन पळसे प्रभारी परीक्षा संचालक म्हणून कार्यरत होते. गेल्या सहा महिन्यापासून शिवाजी विद्यापीठाकडून या पदासाठी निवड प्रक्रिया सुरू आहे. या पदासाठी 3 जून रोजी मुलाखती झाल्या. या मुलाखतीसाठी पात्र 19 उमेदवारांपैकी 13 उमेदवारांनी ही मुलाखत दिली. त्यातून निवड समितीने परीक्षा संचालक म्हणून डॉ. अजितसिंह जाधव यांची निवड केली आहे. डॉ. जाधव यांनी यापुर्वी 2000 ते 2017 पर्यंत इलेक्ट्रॉनिक विभागप्रमुख म्हणून काम केले. तसेच अभियांत्रिकी विद्याशाखा अधिष्ठाता व इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग अभ्यास मंडळ अध्यक्ष म्हणून 2005 ते 2010 पर्यंत काम पाहिले. 2016 ते 2018 या कालावधील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून तीन वर्षे कार्यरत होते. त्यांचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन पेपर प्रसिध्द झाले आहेत. त्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कामाची दखल घेत ही निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
थोडक्यात परिचय
डॉ. जाधव यांचे मूळ गाव मेडसिंगी (ता. सांगोला, जि. सोलापूर) हे आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण आटपाडी येथे तर माध्यमिक शिक्षण सांगोला येथे झाले. अभियांत्रिकीचे संपूर्ण शिक्षण शिवाजी विद्यापीठात झाले असून ते डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. गेल्या 30 वर्षापासून डी. वाय. पाटील विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
ऑफलाईन, ऑनलाईन परीक्षेला महत्व देणार
कोरोना कालावधीतील दोन वर्षे सोडली तर शिवाजी विद्यापीठात ऑफलाईन पध्दतीने परीक्षा घेतल्या जातात. नवीन शैक्षणिक धोरणात ऑनलाईन शिक्षण, परीक्षेला अतिशय महत्व आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठातील परीक्षा पध्दतीत बदल करीत ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पध्दतीने परीक्षा घेण्याचा माझा मानस आहे. तसेच परीक्षा विभागात असलेल्या त्रृटींची पुर्तता करीत आणि सर्व कर्मचाऱयांना एकत्रित करीत प्रामाणिकपणे काम करून विद्यार्थ्यांना न्याय देणार. विद्यार्थी हिताला महत्व दिले जाईल.
कुलसचिव पदासाठी 17 उमेदवारांनी दिल्या मुलाखती
शनिवारी कुलसचिव पदाच्या मुलाखती पार पडल्या. या मुलाखतीसाठी 27 पैकी 17 उमेदवारांनी ही मुलाखत दिली. यामध्ये हेमंत जाधव, मोहन अबदार, राजकुमार पल्हाडे, धनंजय ठोंबरे, नितीन झावरे, भारत पाटील, प्रभाकर रामटेके, विलास शिंदे, महेश काकडे, प्रकाश पाटील, मधुकर भानारकर, अजितसिंह जाधव, लालासाहेब जाधव, विजय खोत, बाजीराव पाटील, डॉ. विलास सोयम, डॉ. विलास नांदवडेकर यांचा समावेश आहे. येत्या दोन दिवसात कुलसचिव पदाची निवड जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे या निवडीकडे शिक्षण वर्तुळाचे लक्ष लागले आहे.