कोल्हापूर: ग्रामसेवकांकडून त्रास होत असल्याने आम्हाला संरक्षण मिळावे अशी तक्रार शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या वडिलांनी नुकतीच दिली आहे. मात्र हा वाद गेल्या काही दिवसांपासून धुमसत असून ग्रामसेवकाला मारहाण केल्याचा फलक गावात झळकला आहे. या फलकावर ग्रामसेवक राजेंद्र डवरी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला असल्याचा फलक लावला असून त्यामध्ये शहीद ऋषिकेश जोंधळे यांचे वडील रामचंद्र जोंधळे यांच्यासह तिघेजण हल्लेखोर असल्याची नावे पोस्टरवर लिहण्यात आली आहेत. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राहण्यासाठी पोलिसांनी हा फलक आज सकाळी उतरवला आहे.
काय आहे फलकांवर?
जाहीर निषेध! जाहीर निषेध!! जाहीर निषेध बहिरेवाडी गावचे सुपुत्र सुसंस्कृत आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व, उच्चविद्याविभूषित, एक हुशार आणि अभ्यासू, बहिरेवाडी गावच्या राजकीय सामाजिक व ऐतिहासिक परंपरेची संपूर्ण जाण असलेले, समाजाच्या सर्व घरातील लोकांमध्ये मनमुराद मिसळणारे, गावच्या भुमापन नकाशाचा संपूर्ण अभ्यास असलेले, पदाचा गर्व, अभिमान न बाळगणारे, एक कुशल प्रशासक, एक कुशल संघटक, अध्यात्मिक, रुढी-परंपरा, धर्मशास्त्र, रिती रिवाज पाळणारे, सर्व परिस्थितीची जाणकार, एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व श्री राजेंद्र शंकरनाथ डवरी यांच्यावर बुधवार दिनांक 16 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास रामचंद्र हरिबा जोंधळे, लक्ष्मण हरिबा जोंधळे, पुंडलिक सदाशिव जोंधळे , दीपक सदाशिव जोंधळे या चार हल्लेखोरांनी एकत्रितपणे प्राणघातक भ्याड हल्ला केला. या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करीत आहोत. सौजन्य राजेंद्र डवरी प्रेमी मित्र मंडळ, असा फलक लावण्यात आला होता.
बहिरेवाडीत तणावाचे वातावरण
जोंधळे आणि डवरी यांचे समोरासमोर घर असल्याने त्यांच्यात काही कारणावरून वाद आहेत. त्यावरूनच हा वाद टोकाला गेला असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली आहे. जोंधळे कुटुंबियाकडून मारहाण झाल्याचा आरोप करत डवरी यांच्या मित्राने गावात फलक लावून हल्ल्याचा निषेध केला आहे. तर जोंधळे यांनी ग्रामसेवकाकडून त्रास होत असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाला दिली आहे. दरम्यान हा वाद टोकाला जाऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने आज सकाळी हा फलक उतरून ठेवला आहे.
Previous Articleसंतापजनक! शहीद ऋषिकेश जोंधळेंच्या कुटुंबियांना ग्रामसेवकाचा त्रास; म्हणाला, तुझ्या मुलाला देशासाठी कोणी मरायला सांगितलं?
Next Article अक्कलकोट येथे तीन मित्रांवर काळाचा घाला









