कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी विमानतळाचा विस्तार महत्वपूर्ण- पालकमंत्री सतेज पाटील
गोकुळ शिरगाव
कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी विमानतळाचा होत असलेला विस्तार महत्वपूर्ण असून कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणांतर्गत भूसंपादनासाठी रूपये २१२.२५ कोटी इतक्या निधीसाठी शक्ती प्रदत्त समितीच्या दिनांक १८.०४.२०२२ रोजीच्या बैठकीत देण्यात आलेल्या मान्यतेनुसार कोल्हापूर विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या २५.४९.९४ हे.आर.चौ.मी. व ०.३४.७५ हे.आर.चौ.मी. करिता नव्याने सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
मंत्री. पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्हा हा विकासाभिमुख जिल्हा असून पर्यटन, उद्योग, शिक्षण, संस्कृती, कला, तंत्रज्ञान आणि कृषी अशा अनेकविध क्षेत्रांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. या सर्व क्षेत्रातील कोल्हापूरचे महत्त्व हे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून वारंवार अधोरेखित करण्यात आले आहे. कोल्हापूर विमानतळ हे भारतीय विमानपत्तन प्राधिकरण यांच्या अधिपत्याखाली येत असून या विमानतळावरून उडान योजनेंतर्गत हवाई वाहतूक केली जात आहे. तथापि, कोल्हापूर विमानतळ हे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी विमानतळाचा विस्तार करणे आवश्यक आहे.
कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी यापूर्वी ५३ कोटी रूपये एवढ्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी उर्वरित २६ कोटी रुपये इतका निधी दिनांक २१ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला वितरीत करण्यात आलेला आहे. विस्तारीकणाच्या पुढील निधीसाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांनी रुपये २१२.२५ कोटी एवढ्या रकमेचा प्रस्ताव प्रशासकीय व वित्तीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर केला होता.आज या प्रस्तावास वित्तीय व प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
महाविकास आघाडी सरकार हे जनतेचे सरकार असून राज्याच्या विकासासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे सहकार्य लाभले असून त्यांचे आभार ही मंत्री पाटील यांनी व्यक्त केले.