म्हासुर्ली वन परिमंडळ कार्यालय अंतर्गत कारवाई; एक मोटर सायकल, करवत जप्त
म्हासुर्ली / वार्ताहर
म्हासुर्ली वन परिमंडळ अंतर्गत येणाऱ्या आमजाई व्हरवडे (ता.राधानगरी) जंगल क्षेत्रातील सागाची झाडे चोरुन फर्निचर बनविण्यासाठी पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवणाऱ्या दत्तात्रय शिवाजी सुतार ( रा.आमजाई व्हरवडे) व त्यास मदत करणारा साताप्पा कृष्णा कवडे ( रा.आवळी बुद्रुक) यांना मोटरसायकलसह वन विभागाने ताब्यात घेऊन वन अधिनियमानुसार गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की आमजाई व्हरवडे येथील वनपरिक्षेत्रात सागवान जातीच्या झाडांची चोरटी तोड झाली होती. त्याबाबत वन विभागाकडून त्याची चौकशी सुरु असताना आमजाई व्हरवडे येथील दत्तात्रय सुतार यांच्या दत्तगुरु फर्निचर मधील पत्र्याच्या शेडमध्ये साग जातीची तोडलेली नऊ झाडे लपवून ठेवल्याचे दिसून आले.
त्यानुसार आरोपी दत्तात्रय सुतार यांची अधिक चौकशी केली असता त्यांना मदत करणारा सहआरोपी साताप्पा कवडे यालाही वन विभागाने ताब्यात घेतले आहे. तसेच सदर गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल व एक करवतही जप्त करण्यात आला असून या दोघाविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) फ ब आणि कलम ४१ (२) ब अंतर्गत गुन्हा नोंद केला असून अधिक तपास सुरू आहे. सदरची कारवाई राधानगरी वनपरिक्षेत्र वनाधिकार अविनाश तायनाक यांच्या मार्गदर्शनाखाली म्हासुर्लीचे वनपाल विश्वास पाटील यांच्यासह उत्तम भिसे, ईश्वर जाधव, उमा जाधव, बाळू डवर, विलास गुरव, जैनुल जमादार, संजय पानारी आदींनी केली.