हणमंतवाडी/वार्ताहर
शिंगणापूर ता. करवीर येथे बारामती मधून कामानिमित्त आलेल्या सुरज उर्फ दीपक संजय वाघ यांनी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करून रातोरात पोबारा केला. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, सुरज वाघ हा सुरुवातीला हनमंतवाडीमध्ये चार वर्षांपूर्वी दुग्ध व्यवसाय करण्याच्या निमित्ताने आला होता. बारामती पैकी इंदापूर या गावचा रहिवासी असलेल्या सुरजने पशुपालनाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला. तो शिंगणापूर मध्ये पूरग्रस्त वसाहतीत भाड्याने राहत होता. या ठिकाणी निकिता पाटील यांच्या महा-ई-सेवा केंद्रात तो काम करू लागला. त्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील महामंडळाचे तसेच इतरही कर्ज प्रकरणी करून देतो असे सांगून लोकांकडून रोख रक्कम व कागदपत्रे त्याने गोळा केली. तर दीपक जाधव यांना दहा लाख रुपयांचे कर्ज मिळवून देतो असे सांगून तीन लाख रुपये मंजूर केले व सदरची रक्कम आरटीजीएस ने त्यांच्या नावे केली पण लगेचच परस्पर स्वतःच्या नावे काढून लांबवली, असे दीपक जाधव यांनी तक्रारीत सांगितले. अशाप्रकारे सुरजने सुमारे ७० ते ८० लाख रुपयांना गंडा घालून महा-ई-सेवा केंद्रातील रोख रकमेसह इन्वर्टर बॅटरी, लॅपटॉप हे सर्व साहित्य गोळा करून रातोरात त्याने पलायन केले. याबाबतची तक्रार पृथ्वीराज शिंदे, निकिता पाटील, दीपक जाधव यांनी करवीर पोलीस ठाण्यात केली आहे. अधिक तपास करवीर पोलीस करत आहेत.