एकूण 121 हरकती दाखल; हरकतींवर 15 जूनला पुणे विभागीय आयुक्तांसमोर होणार सुनावणी
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समितीची प्रारुप प्रभाग रचनेवर बुधवारी अखेरच्या दिवशी 52 हरकती दाखल झाल्या. गेल्या सात दिवसात एकूण 121 हरकती आल्या. लवकरच त्या निवडणूक विभागातर्फे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर केल्या जाणार आहेत. यावर 15 जूनला पुणे विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी होऊन पुढील निर्णय होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात नोडल अधिकारी विजय पाटील यांच्याकडे 2 जूनपासून हरकती दाखल करण्याचे काम सुरु आहे. त्यानुसार बुधवारी अखेरच्या दिवशी 52 हरकती दाखल झाल्या. गेल्या सात दिवसात एकूण 121 हरकती आल्या आहेत. यामध्ये करवीर तालुक्यात सर्वाधिक 34 हरकतींचा समावेश आहे. त्या खालोखाल शाहुवाडी तालुक्यात 24 हरकती, हातकणंगले तालुक्यात 20, पन्हाळा तालुक्यात 6, कागल तालुक्यात 7, राधानगरी व आजरा तालुक्यात प्रत्येकी 9, भुदरगड तालुक्यात 2, शिरोळ तालुक्यात 1, गडहिंग्लज तालुक्यात 5, चंदगड तालुक्यात 4 हरकत दाखल झाल्या. अखेरच्या दिवशी हरकती दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दिवसभर गर्दी दिसत होती. प्राप्त हरकती पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पुढील कार्यवाही सादर केल्या जाणार आहेत.
हातकणंगले तालुक्यातील ग्रामसभांचे ठराव सादर
हातकणंगले तालुक्यातील हालोंडी, मौजे वडगाव, माले, आळते, बिरदेववाडी, लक्ष्मीवाडी, मजले, चोकाक, साजणी, तिळवणी, रुई, माणगाव आदी गावांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघाची झालेली प्रभाग रचना ही निवडणूक आयोगाच्या नियम व अटींची भंग करुन झाली आहे. ती मान्य नसल्याचे ठराव 6 जूनला झालेल्या विशेष ग्रामसभेत मंजूर केले आहेत. ते ठराव बुधवारी संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी नोडल अधिकाऱयांकडे सादर केले.









