अकरावीचा दुसरा अर्ज भरण्यास बुधवारपासून प्रारंभ
प्रतिनिधी/कोल्हापूर
शहरातील 31 कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य, विज्ञान शाखांच्या 10 हजार 960 जागांसाठी अकरावी केंद्रीय पध्दतीने सुरू आहे. अकरावीचा पहिला अर्ज 9 हजार 66 विद्यार्थ्यांनी भरला आहे. तर अकरावीचा दुसरा अर्ज 1 हजार 400 विद्यार्थ्यांनी भरून शाखा, कॉलेज निश्चित केले आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी दिली.
अकरावी वाणिज्य, विज्ञान विभागाचा दुसरा अर्ज भरून प्रवेश निश्चितीला बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. ऑनलाईन कॉलेज आणि प्रवेश निश्चितीमध्ये विज्ञान विभागाला विद्यार्थ्यांनी पसेदी दिली आहे. तर एकेकाळी प्रवेशासाठी अग्रेसर असलेली वाणिज्य शाखेकडील ओढा कमी झाल्याचे प्रवेश अर्जावरू दिसते. दुसरा अर्ज भरताना शाखा आणि कॉलेजचा प्राधान्यक्रम निवडायचा आहे. अर्ज भरताना मूळ गुणपत्रक, जातीचा दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला स्कॅन करून अपलोड करायचा आहे. जातीचा दाखला नसल्याने संकेतस्थळावरील हमीपत्र भरुन अपलोड करायचे आहे. त्यानंतर तीन महिन्याच्या आत जातीचा दाखला संबंधीत महाविद्यालयाच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक. तरी विद्यार्थ्यांनी www.dydekop.org या संकेतस्थळावर दुसरा अर्ज भरावा, असे आवाहन शिक्षण उपसंचालक चोथे यांनी केले आहे.
अकरावी प्रवेश निश्चिती
विज्ञान ः 913
वाणिज्य मराठी माध्यम ः 283
वाणिज्य इंग्रजी माध्यम ः 204
एकूण ः 1400









