रेल्वेप्रमाणे असणार अधिक सरळ; पर्यावरण विभागाच्या सूचनेनुसार आरेखनात काही बदल
राजू चव्हाण खेड
मुंबई ते गोवा प्रवासासाठी लागणारा 12 तासांचा अवधी 6 तासांवर आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या कोकण एक्सप्रेस-वे या नव्या प्रकल्पाच्या महामार्गाचा आराखडा जाहीर करण्यात आला आहे. रेल्वेप्रमाणेच सरळ असणाऱ्या या नव्या प्रकल्पाच्या महामार्गात 6 मार्गिकांचा समावेश असणार आहेत. तसेच दोन सेवा रस्तेही आहेत. केंद्रीय पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असता पर्यावरण विभागाच्या सूचनेनुसार आरेखनात काही बदल करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
एकीकडे मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या 17 वर्षांपासून रखडले असतानाच कोकणातील दळणवळणाची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ‘कोकण एक्स्प्रेस-वे’ प्रकल्प हाती घेतला आहे. 68 हजार कोटी ऊपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या प्रकल्पाचा पहिला टप्पा अटल सेतूवरून अलिबाग-शहाबाद व तिथून पुढे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत हा महामार्ग जाणार असून त्याची रुंदी 100 मीटर असणार आहे.
महामार्गावर 41 बोगद्यांसह 51 मोठे पूल आणि 68 ओव्हरपास असणार आहेत. सागरी महामार्गावर रखडलेल्या आगरदांडा-बाणकोट, रेवस आणि दाभोळ, जयगड या पुलाची निविदाही नव्याने काढण्यात आली आहे. मुंबई-गोवा हमामार्ग आणि सागरी महामार्ग यांचे अंतर 460 कि.मी. असले तरी नवा महामार्ग 376 कि.मी. लांबीचा असल्याने 90 कि.मी.अंतर कमी होणार आहे. अलिबाग-शहाबाद-रोहा-घोसले-माणगाव-मढेगाव-मंडणगड-केळवट-दापोली-वाकवलीगुहागर शहर-रत्नागिरी-गणपतीपुळे-राजापूर-भालवली, देवगड शहर, मालवण शहर, कुडाळ चिपी, सावंतवाडी शहर वेंगुर्ले, बांदा येथून हा महामार्ग मार्गस्थ होणार आहे.
पूर्णत्वासाठी तीन वर्षांची मुदत
या महामार्गासाठी 3,792 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. यातील 146 हेक्टर वनजमीन आहे. केंद्रीय पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असता या विभागाच्या सूचनेनुसार आरेखनात काही बदल करण्यात आले आहेत. हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी 3 वर्षांची मुदत देण्यात आली आहे. एकीकडे मुंबई-गोवा महामार्ग गेल्या 17 वर्षांपासून रखडला असून महामार्गाची अवस्था बिकट आहे. अशाही परिस्थितीत महाराष्ट्र रस्ते महाविकास मंडळाने जाहीर केलेला हा प्रकल्प विहित मुदतीत कितपत पूर्णत्वास जाईल, या बाबत सांशकता व्यक्त केली जात आहे.
नव्या महामार्गाची डेडलाईन कितपत पाळली जाईल?
मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडलेले असताना सरकारने कोकणवासियांना आणखी एका महामार्गाचे गाजर दाखवले आहे. नव्या महामार्गामुळे कोकणातील तालुका-तालुक्यातून महामार्गावरून प्रवास सुस्साट अन् आरामदायी होईल, यात शंका नाही. मात्र, महामार्गाची डेडलाईन कितपत पाळली जाईल हा यक्षप्रश्न असल्याचे मत कोकण विकास समिती संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी व्यक्त केले.