दुसरी कसोटी दुसरा दिवस : शर्मा, जैस्वाल, जडेजा यांची अर्धशतके, भारत मजबूत स्थितीत
वृत्तसंस्था/ पोर्ट ऑफ स्पेन
येथे विंडीजविरुद्ध सुरू झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या विराट कोहलीने कसोटीतील 29 वे आणि 76 वे आंतरराष्ट्रीय शतक नोंदवले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताने पहिल्या डावात 98.2 षटकांत 5 बाद 341 धावा जमविल्या होत्या. कोहली 121 धावांवर धावचीत झाला तर यावेळी रवींद्र जडेजा 54 धावांवर खेळत होता.

शुक्रवारी 4 बाद 288 या धावसंख्येवरून भारताने पुढे सुरुवात केली आणि जडेजा व कोहली यांनी भक्कम फलंदाजी करीत पाचव्या गड्यासाठी 159 धावांची भागीदारी करीत भारताला मजबूत स्थिती प्राप्त केली. कोहलीने 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक नोंदवण्याचा sविक्रम नोंदवणारा पहिला फलंदाज बनला आहे. विशेष म्हणजे भारत व विंडीज यांच्यातील हा 100 वा कसोटी सामना आहे. कोहलीने 206 चेंडूंच्या खेळीत 11 चौकारांसह 121 धावा जमविल्या. जोसेफेने त्याला धावचीत केले. यावेळी भारताच्या 341 धावा झाल्या होत्या. जडेजानेही अर्धशतक नोंदवले. तो यावेळी 54 धावांवर खेळत होता.
भारताची 139 धावांची सलामी
तत्पूर्वी, पहिल्या दिवशीअखेर भारताने यजमान विंडीजविरुद्ध पहिल्या डावात 84 षटकात 4 बाद 288 धावा जमवल्या होत्या. सलामीचा यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा त्याचप्रमाणे माजी कर्णधार विराट कोहलीने शानदार अर्धशतके झळकवली होती. दिवसअखेर कोहली 87 तर अष्टपैलू जडेजा 36 धावावर खेळत होते. तत्पुर्वी जैस्वाल आणि शर्मा यांनी सलामीच्या गड्यासाठी 139 भागीदारी केली होती.

दोन सामन्यांच्या या मालिकेत भारताने पहिली कसोटी केवळ तीन दिवसात जिंकून विंडीजवर 1-0 अशी आघाडी यापूर्वीच घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात कसोटी पदार्पण करणाऱ्या जैस्वालने शतक झळकवले होते तर दुसऱ्या सामन्यात त्याने अर्धशतक नोंदवत आपली निवड सार्थ ठरवली आहे. जैस्वाल आणि कर्णधार शर्मा यांनी 31.4 षटकात 139 धावांची भागीदारी केली. उपाहारापर्यंत भारताने 26 षटकात बिनबाद 121 धावा जमवल्या होत्या.
उपाहारानंतरच्या खेळाच्या दुसऱ्या सत्रात विंडीजच्या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी करत चहापानापर्यंत भारताचे चार फलंदाज बाद केले. होल्डरने जैस्वालला मॅकेन्झीकरवी झेलबाद केले. त्याने 1 षटकार आणि 9 चौकारासह 57 धावा जमवल्या. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला शुभमन गिल पुन्हा एकदा अपयशी ठरला. रॉचने त्याला डिसिल्वाकरवी झेलबाद केले. गिलने 12 चेंडूत 2 चौकारासह 10 धावा जमवल्या. भारताचे दीड शतक 217 चेंडूत फलकावर लागले. वॅरीकेनच्या गोलंदाजीवर कर्णधार शर्मा त्रिफळाचित झाला. त्याने 143 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारासह 80 धावा जमवल्या. उपकर्णधार अजिंक्य रहाणे फारवेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. गॅब्रियलने त्याचा त्रिफळा उडवला. रहाणेने 8 धावा केल्या. भारताची स्थिती चहापानावेळी 50.4 षटकात 4 बाद 182 अशी होती. या सत्रामध्ये भारताने 4 फलंदाज 61 धावात गमवले.
शतकी भागीदारी
विराट कोहली आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनी संघाचा डाव पुन्हा सावरला. पोर्ट ऑफ स्पेनची खेळपट्टी फिरकीला अनुकूल होत असल्याने या दोन्ही अनुभवी फलंदाजांनी सावध पवित्रा घेतला. दरम्यान भारताच्या 200 धावा 351 चेंडूत नोंदवल्या गेल्या. चेंडूवर नजर बसल्यानंतर कोहलीने थोडी फटकेबाजी केली. कोहलीचे अर्धशतक 97 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नोंदवले गेले असून त्याने जडेजासमवेत अर्धशतकी भागीदारी 94 चेंडूत केली. या जोडीने दिवसअखेर संघाची पडझड होऊ दिली नाही. कोहली आणि जडेजा यांनी पाचव्या गड्यासाठी शतकी भागीदारी 169 चेंडूत नोंदवली. खेळाच्या शेवटच्या सत्रात विंडीजचे गोलंदाज बळी घेण्यात अपयशी ठरले. कोहली 8 चौकारांसह 87 तर जडेजा 4 चौकारांसह 36 धावावर खेळत होते. विंडीजतर्फे रॉच, गॅब्रियल, होल्डर आणि वॅरिकेन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला होता.
संक्षिप्त धावफलक : भारत प. डाव 98.2 षटकात 5 बाद 341 (जैस्वाल 1 षटकार आणि 9 चौकारांसह 74 चेंडूत 57, रोहित शर्मा 2 षटकार आणि 9 चौकारांसह 143 चेंडूत 80, गिल 2 चौकारांसह 10, कोहली 206 चेंडूत 11 चौकारांसह 121, रहाणे 8, जडेजा 125 चेंडूत 4 चौकारांसह खेळत आहे 54 ध् अवांतर 11, रॉच, गॅब्रियल, वॅरिकेन, होल्डर प्रत्येकी एक बळी).









