वृत्तसंस्था/ दुबई
सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेला भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आयसीसीने जाहीर केलेल्या वनडेच्या ताज्या मानांकनात दोन स्थानांची प्रगती करीत टॉप पाचमध्ये पुन्हा स्थान मिळविले आहे.
लंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत त्याने दोन शतकांसह तीन सामन्यात 283 धावा फटकावल्या. या कामगिरीमुळे त्याचे 750 मानांकन गुण झाले असून दुसऱया स्थानावरील रास्सी व्हान डर डय़ुसेन (766) व तिसऱया स्थानावरील क्विन्टॉन डी कॉक (759) हे त्याच्या आवाक्यात आले आहेत. पाकचा कर्णधार बाबर आझमने 887 गुणांह पहिले स्थान कायम राखले आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरू असल्याने कोहलीला त्याच्या पुढे असलेल्या खेळाडूंतील गुणांचे अंतर कमी करण्याची संधी आहे.
कोहलीचे सहकारी शुबमन गिल, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव यांनीही या मानांकनात प्रगती केली आहे. लंकेविरुद्ध गिलने पहिले वनडे शतक नोंदवले तर एक अर्धशतकही नोंदवले. त्याने 10 स्थानांची प्रगती करीत 26 वे स्थान मिळविले आहे. त्याने लंकेविरुद्ध 69 च्या सरासरीने 207 धावा जमविल्या. सिराजने गोलंदाजांत 15 स्थानांची प्रगती करीत सित्रा स्थानावर झेप घेतली आहे. त्याने लंकेविरुद्ध 9 बळी मिळविले. त्याचे आता 685 मानांकन गुण झाले आहेत. न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट (730) व ऑस्ट्रेलियाचा हॅझलवुड (727) हे त्याच्या जवळ आहेत. लंकेविरुद्ध दोन सामन्यात 5 बळी मिळविणाऱया कुलदीप यादवने सात स्थानांची बढती मिळवित 21 वे स्थान पटकावले आहे.









