अश्विन वर्षांतील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू पुरस्काराच्या शर्यतीत
वृत्तसंस्था/ दुबई
भारतीय संघातील अनुभवी आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहली तसेच प्रमुख अष्टपैलू रविंद्र जडेजा यांच्यात आयसीसीच्या पुरूषांच्या वर्षातील सर्वोत्तम सोबर्स चषक पुरस्कारासाठी चुरस निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे 2023 सालातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटूच्या शर्यतीमध्ये भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनचा समावेश आहे.
आयसीसीच्या पुरूषांच्या वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूला सर गारफिल्ड सोबर्स चषक प्रदान केला जातो. या सर्वोत्तम पुरस्कारासाठी आता प्रामुख्याने विराट कोहली, रविंद्र जडेजा, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि ट्रेव्हिस हेड यांच्यात चुरस लागली आहे. त्याचप्रमाणे 2023 च्या सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटूच्या शर्यतीमध्ये भारताचा रविचंद्रन अश्विन, ऑस्ट्रेलियाचे ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा आणि इंग्लंडचा जो रूट यांचा समावेश आहे. कोहलीने 2023 च्या क्रिकेट हंगामात कसोटी आणि वनडे प्रकारातील एकूण 35 सामन्यात 2048 धावा जमविल्या असून त्याने वनडे क्रिकेटमध्ये शतकांचे अर्धशतक नोंदवून सचिन तेंडूलकरचा विक्रम मागे टाकला आहे. भारतात झालेल्या आयसीसीच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत कोहलीने हा विक्रम नोंदविला होता. अष्टपैलू जडेजाने 2023 च्या क्रिकेट हंगामात एकूण 35 सामन्यात फलंदाजी करताना 613 धावा तर गोलंदाजीत 66 बळी मिळविले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या बॉर्डर-गावसकर चषक मालिकेत जडेजाने 22 गडी बाद केले होते.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने 2023 च्या क्रिकेट हंगामात 24 सामन्यात फलंदाजी करताना 422 धावा तर गोलंदाजीत त्याने 59 बळी मिळविले होते. ऑस्ट्रेलियाला अॅशेस मालिका तसेच आयसीसीची विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा त्याचप्रमाणे आयसीसीची विश्व चषक क्रिकेट स्पर्धा जिंकून देण्यात कमिन्सचे योगदान महत्वाचे ठरले आहे. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडने 2023 च्या क्रिकेट हंगामात 31 सामन्यात 1698 धावा जमविल्या असून त्यामध्ये आयसीसीची विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामन्यात तसेच आयसीसीच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात त्याने भारता विरुद्ध शतके झळकविली.
भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या मानांकन यादीत वर्षअखेरीस आखाडीचे स्थान मिळविताना 17.02 धावांच्या सरासरीने 41 गडी बाद केले आहेत. तसेच त्याने कसोटीमध्ये या कालावधीत 5 वेळेला 5 पेक्षा अधिक गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. इंग्लंडतर्फे जो रूट हा कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या वर्षी सर्वात यशस्वी फलंदाज ठरला असून त्याने 8 कसोटीत 787 धावा जमविल्या आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज उस्मान ख्वाजाने 2023 च्या क्रिकेट हंगामात कसोटीत 52.60 धावांच्या सरासरीने 1210 धावा जमविल्या असून त्यामध्ये 3 शतकांचा समावेश आहे. आयसीसीच्या वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूला रॅचेल हेवोई फ्लिंट चषक दिला जातो. या चषकासाठी आता लंकेची चमारी अट्टापटू, ऑस्ट्रेलियाचे गार्डनर आणि बेथ मुनी व इंग्लंडची नॅट स्किव्हेर ब्रंट यांच्यात चुरस आहे.









