हॉटेल व्यवस्थापनाकडून माफीनामा, कर्मचारी निलंबित
वृत्तसंस्था/ पर्थ
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने त्याच्या क्राऊन पर्थ या हॉटेलमधील रूममध्ये एका चाहत्याने घुसखोरी करीत रूमचे व्हिडिओ चित्रण करून तो व्हायरल केल्यानंतर संतप्त झाला असून त्याने या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने त्याची बिनशर्त माफी मागितली आणि परवानगीशिवाय व्हिडिओ चित्रण केलेल्या कॉन्ट्रक्टरला निलंबित केले असल्याचे सांगितले.
सोशल मीडियावर व्हायरला झालेला व्हिडिओ शेअर करीत कोहलीने म्हटले की, चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला पाहून आनंदित व उत्साहित होतात, हे मी समजू शकतो. ते खेळाडूंना भेटण्यासाठी उत्सुकही असतात आणि त्याचे मला कौतुकही वाटते. पण हा व्हिडिओ भयावह असून माझ्या प्रायव्हसीवरच आक्रमण केले आहे. हा प्रकार अजिबात सहन करता येणार नाही,’ असे विराटने म्हटले आहे. ‘माझ्या स्वतःच्या हॉटेल रूममध्ये प्रायव्हसी नसेल तर मी पर्सनल स्पेसची अपेक्षा कशी करायची? असे उल्लंघन मी अजिबात सहन करणार नाही. लोकांच्या प्रायव्हसीचा आदर करा, त्यांना मनोरंजनाची वस्तू समजू नका,’ असेही त्याने म्हटले आहे.
या चाहत्याने कोहलीच्या रूममध्ये शिरकाव करून खोलीत फिरत चित्रण केले. त्यात कोहलीचे कपडे, शूज, सुटकेस, हेल्थ सप्लिमेंट, कॅप, गॉगल्स अशा वस्तू दिसून आल्या आणि नंतर किंग कोहलीची हॉटेल रूम, अशी कॅप्शन देत तो व्हिडिओ व्हायरल केला होता. चित्रण करताना हॉटेल स्टाफमधील काही सदस्यही उपस्थित असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मानेही या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.









