कुस्ती क्षेत्रात निर्माण झाली पोकळी.
विश्वनाथ मोरे कसबा बीड / प्रतिनिधी
कोगे येथील सर्वसामान्य कुटुंबात 1/6/1968 रोजी जन्माला आलेले वस्ताद बळी उर्फ एम एस पाटील सर ( मारुती पाटील)वस्ताद होण्यापूर्वी चटकदार कुस्ती करणारा मल्ल म्हणून प्रचलित होते. गावातील हनुमान तालीम मंडळ येथून आपल्या कुस्तीची सुरुवात करून अनेक गावातील जत्रा स्पर्धेमध्ये त्यांनी कुस्त्या जिंकून एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. पूर्वी राम सारंग सरांनी 50 किलो गटांमध्ये राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण पदक घेतले. त्याच वजन गटांमध्ये मारुती पाटील यांनी शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये कोल्हापूरचा दबदबा निर्माण केला होता. कुस्तीगीर राष्ट्रीय अधिवेशनामध्ये 48 वजन गटामध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली. हरियाणातील रोहटच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मारुती पाटील यांनी कुस्ती जिंकली होती.त्यानंतर आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कुस्ती स्पर्धे मध्ये भाग घेऊन एक मोठा मल्ल व्हायचे स्वप्न पाहिले होते. पण ते त्यांचे स्वप्नच राहिले म्हटले तर वावगे होणार नाही.
1995 मध्ये त्यांना अचानक मणक्याचा त्रास सुरू झाला.मज्जारज्जूला गाठ निर्माण झाल्यामुळे त्यांना ऑपरेशन करायची वेळ आली.या ऑपरेशनला बराच वेळ झाला पण म्हणावे तसे यश मिळाले नाही.कुस्त्या खेळणाऱ्या मल्लास दोन्ही पायाने अपंगत्व निर्माण झाले. ज्या पायावर उभे राहून मनी बाळगलेले स्वप्नांचे शिवधनुष्य पेलायचे ते दोन्ही पायच लुळे पडलेत . ऐन उमेदीतच कायमचे अपंगत्व आले .आधाराशिवाय उभे राहणे मुश्किल झाले . मनी बाळगलेल्या स्वप्नांचा चक्काचूर झाला . तरीही लढण्याची जिद्द कायम आहे. अपंगत्वावर मात करत आपल्या शिष्याकरवी ही स्वप्ने सत्यात उतरत नियतीलाही चितपट करणाऱ्या कोगे (ता करवीर ) येथील हनुमान तालमीचे वस्ताद मारूती शामराव पाटील तथा बळी वस्ताद यांचा जीवनपट मन हेलावणारा असला तरी कुस्ती क्षेत्राला एक नवा आदर्श देणारा आहे.
पण कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर सध्या ते दोन्ही हातात काठ्या घेऊन काठयांच्या आधाराने चालतात. कुस्ती नसानसात भिनलेली असल्याने त्यांनी स्वतःचे अपंगत्व , पत्नी हृदयविकाराने त्रस्त , मुलांच्यावरील शस्त्रक्रिया यातूनही स्वतःला सावरत . हनुमान तालमीच्या माध्यमातून मल्ल घडविले.नियतीच्या या आघातानेही बळी वस्ताद डगमगले नाहीत . काठीच्या आधाराने चालत तालमीच्या कटयावर बसून त्यांनी गावातील मल्लांना त्यांनी कुस्तीचे धडे दिलेत . कुस्ती क्षेत्रात कर्तृत्व दाखविण्याची त्यांची अपूर्ण इच्छा हनुमान तालमीत ७०ते ८० मल्लांना मार्गदर्शन करून ते पूर्ण करत आहेत . त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या त्यांच्या अनेक चेल्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा गाजवत आहेत .
कुस्तीसाठी धडपडणाऱ्या बळी वस्तादवर नुकतीच तिसऱ्यांदा मोठी शस्त्रक्रिया झाली आहे . पाच लाखावर खर्च झाला असून अदयापही उपचार घ्यावे लागले. अशा या हरहुन्नरी कुस्ती करणारा व आपल्या जीवनामध्येअनेक महिला व पुरुष मल्ल तयार करणारा वस्तादाने शनिवारी दुपारी 12.30 वाजताजगाचा निरोप घेतला.कोगे गावातील कुस्ती पंढरीतील एक अनोखा तारा निखळला त्यांच्या निधनाने कोगे गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
आंतर राष्ट्रीय मल्ल अमर फाटक , सुनिल फाटक हे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयार झाले . केवळ मर्दाचा खेळ म्हणून कुस्तीची गणना होत असताना बळी वस्तादानी कोगे सारख्या ग्रामीण भागातून महिला कुस्तीगीर आखाड्यात उतरण्याचा कोल्हापूर जिल्हयात पाहिला प्रयोग केला . त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावात वीसवर महिला मल्ल तयार झालेत . यामध्ये पुष्पा मोरे , पुजा फडतारे , माधुरी घराळ यांनी राष्ट्रीय व् आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे.