देशातील पहिली वॉटर मेट्रो उद्यापासून धावणार
वृत्तसंस्था/ कोची
देशातील पहिल्या वॉटर मेट्रो सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवार, 25 एप्रिल रोजी होणार आहे. कोची येथे ही सेवा सुरू होत असून या प्रकल्पावर 1,136.83 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत जवळपासची 10 बेटे कोची शहराशी जोडली जातील. ही नॉन-स्टॉप कनेक्टिव्हिटी बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक हायब्रीड बोटींद्वारे केली जाईल. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कोची वॉटर मेट्रोचे वर्णन राज्याचा “ड्रीम प्रोजेक्ट” असे केले. तसेच दक्षिणेकडील राज्यांच्या वाहतूक आणि पर्यटन क्षेत्रासाठी सुगीचे दिवस सुरू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोची वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात लवकरच हायकोर्ट-वायपिन टर्मिनल्सपासून व्याटिला-कक्कनाड टर्मिनल्सपर्यंत सेवा सुरू करण्यात येणार आहे. ‘कोची-1’ कार्ड वापरून प्रवासी कोची मेट्रो आणि वॉटर मेट्रो या दोन्ही मार्गांनी प्रवास करू शकतात. याशिवाय ते डिजिटल पद्धतीनेही तिकीट बुक करू शकतात, असे मेट्रो प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.
वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन
दरम्यान, पंतप्रधान 25 एप्रिल रोजी तिऊअनंतपुरम सेंट्रल स्टेशनवर तिरुअनंतपुरम आणि कासारगोड दरम्यान केरळमधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. ही टेन तिऊवनंतपुरम, कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम, त्रिशूर, पलक्कड, पठानमथिट्टा, मलप्पुरम, कोझिकोड, कन्नूर आणि कासारगोड या 11 जिल्ह्यांमधून जाणार आहे. याशिवाय पंतप्रधान तिऊवनंतपुरममध्ये डिजिटल सायन्स पार्कची पायाभरणी करतील.









