अनेक सुंदर बंगले, परंतु खरेदीदारच नाही
इमारतीत राहणारे लोकच त्याला घराचे स्वरुप मिळवून देत असतात असे बोलले जाते. माणसांशिवाय इमारतींना कुठलेच मोल नसते. याचेच एक उदाहरण चीनमध्ये वसविण्यात आलेले एक आलिशान शहर आहे. या शहरात कुणीच राहत नाही. या शहरात अनेक सुंदर अन् भव्य इमारती आहेत. सध्याच्या काळात सुंदर घरासाठी लोक कितीही रक्कम खर्च करायला तयार आहेत. अशा स्थितीत अत्यंत मूल्यवान बंगले तेथे रिकामी पडले आहेत. चीनच्या ग्रीनलँड प्रांतात हा प्रकार घडला आहे. हे ठिकाण कधीकाळी देशातील धनाढ्यांचे वास्तव्यस्थान होते, परंतु आता ते पूर्णपणे निर्जन ठरल्याने याला भूतांचे शहर असे संबोधिले जात आहे.
ग्रीनलँडच्या लियाओनिंगमध्ये चीनच्या धनाढ्या लोकांसाठी 260 व्हिलाच्या गेस्ट मेंशन प्रोजेक्टची सुरवात झाली होती. 2010 मध्ये ग्रीनलँड कंपनीने हा प्रकल्प हाती घेतला होता. दोन वर्षांपर्यंत येथे जोरदार काम झाले, परंतु अचानक हा प्रकल्प अर्धवट सोडून देण्यात आला. यामागील नेमके कारण कधीच सांगण्यात आलेले नाही. या घरांबाबत कुणीच आता विचारणा देखील करत नाही. सद्यघडीला हे निर्जन शहर ठरले आहे.
येथील सुंदर इंटीरियरमध्ये आता गवत उगवले असून येथील कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक आता वाया गेल्यातच जमा आहे. चीनमध्ये केवळ एकच निर्जन शहर नसून याचबरोबर अनेक नियोजित शहरे निर्जन ठरली आहेत.