कालौघात विस्मृतीत गेलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा होणार सन्मान ः संसदेच्या स्थायी समितीची शिफारस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शिक्षण मंत्रालयाशी निगडित संसदेच्या स्थायी समितीने शालेय अभ्यासक्रमात बदल करण्याची शिफारस केली आहे. शालेय पुस्तकांमध्ये सर्व धर्मांशी निगडित महापुरुषांवरील धडय़ांना सामील करण्यात यावे. सरकारने शालेय पुस्तकांमये धार्मिक शिक्षणाच्या वैविध्याला स्थान द्यावे अशी शिफारस या समितीने केली आहे.
संशोधित राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या रुपरेषेत (एनसीएफ) या गोष्टींना सामील करण्यात यावे. शाळेत मुलांना अर्थव्यवस्था आणि संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रातील भारताच्या कामगिरीचा इतिहास शिकविण्यात यावा. अभ्यासक्रमात महिला सशक्तीकरणालाही सामील करण्याची सूचना संसदेच्या स्थायी समितीने केली आहे.

एनसीईआरटी आणि एससीईआरटीला शालेय अभ्यासक्रमांमध्ये वेद तसेच अन्य प्राचीन गंथांशी निगडित शिक्षण आणि ज्ञान सामील करण्यात यावे. यामुळे मुलांचे जीवन आणि समाजाशी निगडित शिक्षण मिळेल असे समितीने म्हटले आहे. राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुरुप शालेय अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमांसाठी दिशानिर्देश निर्धारित करणार आहे.
समितीने कालौघात विस्मृतीत गेलेल्या स्वातंत्र्यसेनानींच्या योगदानाला अभ्यासक्रमात समान महत्त्वासह सामील करण्याची मागणी केली. याकरता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एनसीईआरटीसोबत मिळून योजना तयार करावी अशी सूचना केली आहे. देशात महान स्वातंत्र्यसेनानींनाही गुन्हेगाराच्या स्वरुपात सादर करण्याचा चुकीचा प्रकार घडला आहे. राजघराण्यांबाबतही समानतेने शिकविले जात नाही. शीख आणि मराठा इतिहासाला अभ्यासक्रमात फारच कमी स्थान मिळाले असून यात सुधारणा केली जावी असे समितीकडून म्हटले गेले आहे.
समितीच्या विविध सूचना स्वीकारण्यात आल्या आहेत. त्यानुसार अभ्यासक्रमात बदल केले जाणार आहेत. सहावी आणि सातवीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात वेद तसेच भगवद्गीतेचे धडे असणार आहेत असे शिक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. अन्य सर्व धर्म तसेच प्राचीन ग्रंथांमधील शिकवण देखील शिक्षणात सामील करण्याची मागणी समितीने केली आहे.









