अध्याय एकोणीसावा
कौरव पांडवांचे युद्ध संपले. पांडव विजयी झाले. भगवंतांनी धर्मराजाला हस्तिनापूरच्या गादीवर बसवले पण युद्धात झालेला नरसंहार बघून धर्मराजाचे मन उद्विग्न झाले होते. हे सर्व माझ्यामुळे झाले असे त्यांना वाटू लागले. अज्ञानामुळे धर्मराज स्वतःला कर्ता समजू लागले होते.
प्रत्यक्षात उत्पत्ती, स्थिती व प्रलयकर्ता एक ईश्वरच आहे पण त्याचा त्यांना विसर पडला. त्यांना झालेला भ्रम दूर करण्यासाठी भगवंत त्यांना पितामह भीष्माचार्यांकडे घेऊन गेले. त्यावेळी उत्तरायणाची वाट पहात भीष्माचार्य शरपंजरी पडले होते. त्यांनाच धर्मराजाना प्रश्न विचारायला लावले. भगवंत उद्धवाला म्हणाले, तू मला, समस्त संसारी जनांना संसाररूप सर्पाने ग्रासलेले आहे, म्हणून ते आत्मसुखाला विसरून विषयसुखाला भुलले आहेत अशा दीन जनांचा आपण कृपा करून उद्धार करावा अशी विनंती केली होतीस. त्या विनंतीला उत्तर म्हणून मला भीष्माचार्य व धर्मराज यांच्यातील संवाद आठवला. संसारात विषयसुखात बुडालेल्या दिनजनांचा उद्धार कसा होईल याचे उत्तर धर्मराजाच्या प्रश्नांना भीष्माचार्यांनी दिलेल्या उत्तरातून तुला मिळेल.
ते धर्माने केलेले प्रश्न आता ऐक. त्याने राजधर्म विचारला, दानधर्म विचारला, आपद्धर्म विचारला व मुख्यत्वेकरून उत्तमोत्तम असा मोक्षधर्मही विचारला. त्यावेळी भीष्मांच्या तोंडून ऐकलेले धर्म मी तुला सांगतो. ते ज्ञान, वैराग्य, विज्ञान, श्रद्धा आणि भक्तीने परिपूर्ण आहेत. त्यांच्या योगाने संसाराचा भ्रम दूर होतो व सर्व कर्म दग्ध होऊन जाते. ज्ञान, विज्ञान, श्रद्धा, भक्ती, अनित्याचा नाशवंतपणा व वैराग्यस्थिती इत्यादींविषयी भीष्मांनी धर्माला सांगितले. तेच मी तुला यथार्थ रीतीने सांगतो. त्यात मुख्यत्वेकरून प्रथम ‘ज्ञान’ सांगितले. त्या ज्ञानाने सर्वांमध्ये एकच परमात्मतत्त्व व्यापून आहे, हे लक्षात घेतले जाते, तेच परोक्ष ज्ञान होय. सर्व तत्त्वांची संख्या एकत्र केली म्हणजे ‘अठ्ठावीस’ होते.
ही सर्व तत्त्वे सर्व प्राणिमात्रांमध्ये समसमान भावाने वागत असतात. ब्रह्मदेवापासून तो स्थावरापर्यंत ही सर्व तत्त्वे सर्वामध्ये सारखी भरलेली आहेत. उद्धवा! यात खरोखर एकही अधिक किंवा उणे होत नाही, हे लक्षात ठेव महादेवापासून, माशीपर्यंत सर्वांच्या शरीरात जीवपणा हाही सारखाच असतो. प्राणिमात्रामध्ये चैतन्य हे समसमानच असल्यामुळे सर्वांचा आत्मा एकच आहे, असे समजणे याचेच नांव ‘शुद्ध ज्ञान’ आणि माझेही ठाम मत तेच आहे. आता विज्ञानाचेही सारे लक्षण तुला सांगतो. व्यापक अशा परब्रह्माने देहादिक सारी तत्त्वे व्यापलेली आहेत, असे तो अगदी जीवाभावाने निश्चितपणे पाहतो. ज्याप्रमाणे घटादिकांला अंतर्बाह्य आकाशच व्यापलेले असते, त्याप्रमाणे साऱया प्रपंचाला चिदाभासच व्यापून राहिलेला आहे. असे जर शुद्ध ज्ञान, तेच ज्ञेयप्राप्तीला कारण असते आणि ज्ञेय प्राप्त झाले की, ते ज्ञान वृत्तीसह लोपून जाते हेच विज्ञान होय. ते केवळ ज्ञानानेच जाणले जाते, म्हणून त्याला ‘ज्ञेय’ असे म्हणतात.
ज्ञेय प्राप्त झाले की, सूर्याच्या तेजाने काजवा लाजून जातो, त्याप्रमाणे ते ज्ञानही लज्जायमान होते. मीठ पाण्यात शिरले असता मिठाचा मीठपणाच नाहीसा होतो. त्याप्रमाणे ज्ञेय प्राप्त झाल्यानंतर ज्ञानाचा ज्ञातेपणाच नाहीसा होतो. ज्ञेयाची यथार्थ प्राप्ती झाली की, स्वरूपात केवळ चिन्मात्रताच राहते. तेव्हा व्याप्य-व्यापक व साधकबाधक असे कांही राहातच नाही. ज्याप्रमाणे सूर्योदय झाला म्हणजे नक्षत्रांसहवर्तमान चंद्र जसा लोपून जातो, त्याप्रमाणे ज्ञेयाच्या प्राप्तीपुढे साऱया जगासहवर्तमान ज्ञानसंपत्तीचाही लोप होऊन
जातो.
अशा प्रकारचे सांख्य अपरोक्ष ज्ञान जोपर्यंत झालेले नसते, तोपर्यंत देहादिक जे प्रपंचाचे स्वरूप आहे ते व जग हे आत्म्याहून भिन्न असे तो मानतो आणि कोरडय़ा शब्दांनी ब्रह्मज्ञानाची वटवट करतो. असे जे शुद्ध शाब्दीक महाज्ञान, तेही त्रिगुणात्मकच असते आणि परब्रह्म वस्तु तर निराकार व निर्गुण आहे तिला जन्मही नाही आणि मरणही नाही असे समज. त्रिगुणात्मक म्हणून जेवढे आहे, तेवढे सारे नाशवंतच आहे.
क्रमशः







