दुष्काळजन्य परिस्थिती : नियोजनाचा अभाव, धोक्याची घंटा वाजली, राकसकोपनेही तळ गाठला
बेळगाव : वळिवाने दडी मारली आणि मान्सूननेही हात दाखविला. त्यामुळे आता अवस्था गंभीर बनत चालली आहे. राकसकोपनेही तळ गाठल्याने दुष्काळाच्या झळा वाढत चालल्या आहेत तर पाण्याची समस्या उभी ठाकली आहे. त्यामुळे भटकंतीची वेळ आली असून आतातरी पाणी जपून वापरण्याची गरज आहे. नियोजनाचा अभाव असून आतातरी धोक्याची घंटा ओळखून पाणी जपून वापरण्यावर भर देणे गरजेचे आहे. ओला किंवा सुका दुष्काळ असला तरी भरडतोय शेतकरीच. त्यामुळे आता परिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे असून पिके वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुष्काळ असो किंवा अतिवृष्टीने शेतकऱ्याचे नुकसान हे निश्चित ठरले आहे. केवळ नियोजनाच्या अभावामुळे हा फटका दरवषी शेतकऱ्यांना बसत आहे. सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या पाणी अडवा, पाणी जिरवा किंवा तलावाची उभारणी अशाप्रकारच्या योजना सरकार राबविण्याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे याचा फटका दरवषी शेतकऱ्यांना तर बसतच आहे. पण यामुळे पाण्याची समस्याही गंभीर बनत चालली आहे. यासाठी सरकारने योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
खरीप व रब्बी अशी दोन प्रकारची पिके शेतकरी घेत असतात. खरीप पीक हे पूर्णत: पावसावरच अवलंबून असते. तर रब्बी पीक हवामान आणि विहीर किंवा कूपनलिकेच्या पाण्यावर विसंबून असते. बऱ्याचवेळा मान्सून हाहाकार माजवितो. त्यामुळे पिके तर खराब होतातच. पण ते पाणी नदीवाटे थेट समुद्राला मिळते. एकूणच पावसाचे पाणी पूर्णपणे वाया जाते. सध्या काही प्रमाणात पाणी अडवा, पाणी जिरवा या योजनेंतर्गत नदी-नाल्यांवर फळ्या घालून पाणी अडविले जात आहे. पण म्हणावी तशी प्रभावीपणे ही योजना राबविण्यात आली नाही. यामुळे पाणी हे वाया जात आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा याचबरोबर तलाव खोदाई करून त्यामध्येही पाणीसाठा केला तर तो भविष्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. पण कर्नाटकात म्हणावे तशा या योजना राबविण्यात आल्या नाहीत. याबाबत महाराष्ट्राने मात्र आघाडी घेतली असून शेत तलावाबरोबरच पाणी अडवा, पाणी जिरवा ही योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांना याचा फायदा करून दिला आहे. सध्या कर्नाटकात रोजगार हमी योजनेंतर्गत तलाव, नदी, नाले यांची खोदाई करण्यात येत आहे. पण पाणीसाठ्यासाठी किंवा पाणी जिरविण्यासाठी कोणतीच ठोस अशी योजना राबविली जात नाही. येथील शेतकरी पूर्णत: निसर्गावरच अवलंबून आहेत. त्यामुळे दरवषीच शेतकऱ्यांना फटका बसू लागला आहे. बळ्ळारी नाल्याचा प्रश्न दरवषीचाच डोकेदुखी ठरू लागला आहे.
जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
तहान लागली की विहीर खोदाई केली जाते. पण जर योग्य नियोजन केले तर विहीर खोदाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पाणी टंचाईमुळे सर्वच जण आरडाओरड करत असतात. पण पाऊस लागल्यानंतर मात्र उन्हाळ्यामध्ये झालेला त्रास सारेच जण विसरतात. जनतेबरोबर जिल्हा प्रशासनही त्याकडे दुर्लक्ष करते. शेतकरीही अशा प्रकारेच वावरताना दिसतात.









