पाटील मळा येथे मिळकतीच्या वादातून हल्ला : पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा
बेळगाव : बुधवारी रात्री मिळकतीच्या वादातून चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या पाटील मळा येथील युवकाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. यासंबंधी गुरुवारी खडेबाजार पोलीस स्थानकात पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाच्या या घटनेने पाटील मळा परिसरात खळबळ माजली आहे. अनिल शरद धामणेकर (वय 46) रा. पाटील मळा असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. यासंबंधी त्याचा पुतण्या आदित्य दीपक धामणेकर, वंदना दीपक धामणेकर, दोघेही राहणार पाटील मळा, हरि ओम खाडे, रा. आनंदवाडी याच्यासह एकूण पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून झालेल्या अनिलची पत्नी स्वाती धामणेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
बुधवार दि. 26 मार्च रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पाटील मळा येथे चाकू हल्ल्याची घटना घडली होती. चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अनिलला स्थानिक नागरिकांनी विनाविलंब सिव्हिल हॉस्पिटलला हलविले. उपचाराचा उपयोग न होता रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. उपलब्ध माहितीनुसार मिळकतीच्या वाटणीच्या वादातून ही घटना घडली आहे. वाटणीसाठी अधूनमधून प्रयत्न सुरू होते. बुधवारी रात्री वाटणीसाठीच्या वादावादीनंतर आदित्यने अनिलवर चाकू हल्ला केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी वंदना व हरि यांना ताब्यात घेतले असून आदित्यचा शोध घेण्यात येत आहे. गुरुवारी दुपारी उत्तरीय तपासणीनंतर सदाशिवनगर स्मशानभूमी येथे अनिलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी, उपनिरीक्षक आनंद आदगोंडा व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. चाकू हल्ल्यात अनिल रक्तबंबाळ झाला होता. डाव्या बाजूची बरगडी आणि पोटावर वर्मी वार लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.









