निवडणूक प्रचारादरम्यान घटना : जमावाकडून आरोपीला मारहाण
वृत्तसंस्था/ सिद्दीपेट
तेलंगणातील मेडकचे खासदार आणि विधानसभा निवडणुकीतील भारत राष्ट्र समितीचे उमेदवार कोथा प्रभाकर रेड्डी यांच्यावर सोमवारी चाकूने हल्ला करण्यात आला आहे. सिद्दीपेटच्या सुरामपल्ली गावात प्रचारासाठी रेड्डी हे पोहोचले असताना हा प्रकार घडला आहे.
प्रभाकर यांच्या पोटावर चाकूने वार करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर खासदाराला त्वरित रुग्णालयात नेण्यात आले, जेथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच खासदारांना पुढील उपचारासाठी हैदराबाद येथे हलविले जाण्याची शक्यता आहे. तर जमावाने हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडून जबर मारहाण केली आणि त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन पेले आहे.
हल्लेखोराला पकडण्यात आले असून त्याची ओळख पटविली जात आहे. तसेच हल्ल्यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती सिद्दीपेटच्या पोलीस आयुक्त एन. श्वेता यांनी दिली आहे. तर हल्ल्याची माहिती मिळाल्यावर बीआरएसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रभाकर रेड्डी यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. राज्याचे मंत्री टी. हरिश राव यांनी खासदारांशी संपर्क साधला. तसेच त्यांनी स्वत:चा प्रचार कार्यक्रम आटोपता घेत जखमी खासदाराची भेट घेण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली आहे. कोथा प्रभाकर रेड्डी यांनी मेडक लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीचे उमेदवार म्हणून विजय मिळविला होता.
तेलंगणात निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या या हल्ल्यामुळे उमेदवारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तेलंगणाततील कुथबुल्लापूर येथे बीआरएस आमदार विवेकानंद गौड यांनी भाजप उमेदवार कुना श्रीशैलम गौड यांच्यावर हल्ला केला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.









