लोणंद/प्रतिनिधी
लोणंद नगरपंचायतीच्या नगरसेविका तृप्ती राहुल घाडगे यांना तीन अनोळखी व्यक्तींनी चाकूचा हातावर वार करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, मोबाइल व रोख रक्कम असा एकूण १९ हजार ८५० रुपयांचा ऐवज लंपास केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, लोणंद गावच्या हद्दीत सोमवारी पावणे दहाच्या सुमारास निंबोडी ता. खंडाळा रोडवरील इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये मिटिंगसाठी तृप्ती घाडगे या त्यांच्या गाडीवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकलवरील तीन अनोळखी चोरट्यांनी येऊन एकाने मोटारसायकल थांबवून त्याच्याकडील सुऱ्याने धाक दाखवत गळ्यातील सोन्याचे ८ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, एक मोबाईल व १८५० रु. रोख रक्कम असा एकूण १९ हजार ८५० रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेला आहे. चोरी करताना चोरट्याने तृप्ती घाडगे यांच्या डाव्या हातावर चाकूचा वार करून त्यांना जखमी केले, अशी फिर्याद तृप्ती घाडगे यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिली असून लोणंद पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पंचनामा पोलिसांनी करून तीन अनोळखी इसमांचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेचा अधिक तपास व्ही. के. धुमाळ हे करीत आहेत.









