वृत्तसंस्था/अॅमस्टरडॅम
नेदर्लंडस् या देशाची राजधानी अॅमस्टरडॅम येथे झालेल्या चाकूहल्ल्यात 5 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. गुरुवारी ही घटना घडली. हा दहशतवादी हल्ला असावा असे मानले जात आहे. मात्र, अद्याप तेथील पोलिसांनी नेमकी परिस्थिती स्पष्ट पेलेली नाही. जखमी झालेल्यांपैकी दोघांची स्थिती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली आहे. अॅमस्टरडॅम शहराच्या मध्यवर्ती भागात हा हल्ला झाल्याने जनतेत घबराट पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची नाकेबंदी केली असून पुढील तपास चालविला आहे. या हल्ल्याचे कारण काय असावे, याचा शोध घेतला जात असून हे कारण समजल्यानंतरच तपासाची दिशा निश्चित होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. युरोपात अनेक देशांमध्ये चाकूहल्ल्याच्या घटना घडल्या असून त्यांचा संबंध दहशतवादाशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा हल्लाही त्याच प्रकारचा असावा ही शक्यता गृहित धरुन तपास करण्यात येत आहे.









