प्रतिनिधी / बेळगाव
उज्ज्वलनगर येथील सेवा रस्त्याच्या एका बाजूला गुडघाभर पावसाचे पाणी तुंबून राहत असल्याने त्यातूनच वाहनचालकांना ये-जा करण्याची वेळ आली आहे. सेवा रस्त्यापेक्षा गटारींची उंची अधिक असल्याने रस्त्यावरील पावसाचे पाणी गटारीत वाहून जाण्याऐवजी रस्त्यावरच तुंबत आहे. अशास्त्रीय पद्धतीने गटारीचे बांधकाम करण्यात आल्याने याचा फटका वाहनचालकांना सहन करण्याची वेळ आली आहे.
उज्ज्वलनगर येथील सेवा रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करत असतात. मात्र महामार्गालगत सेवा रस्त्यावर बांधण्यात आलेली गटार रस्त्यापेक्षा उंच झाली आहे. परिणामी रस्त्यावरील पाणी गटारीत वाहून जाण्याऐवजी रस्त्यावरच तुंबून राहत आहे. यामुळे डांबरी रस्तादेखली खराब होत असून भरधाव वाहन तेथून गेल्यास पावसाचे पाणी नागरिकांच्या अंगावर उडत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी गटारीतून वाहून जावे यासाठी महापालिकेकडून किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याकडून प्रयत्न व्हावेत, अशी मागणी केली जात आहे.









