कोल्हापूर :
कोल्हापूर महापालिका परिवहन विभागात (केएमटी) चालकांची नियुक्ती करताना पुर्ण प्रशिक्षण व सक्षमता तपासली जाते. यासाठी केएमटी अपघात विभागातील तज्ञ इन्स्पेक्टर यांच्याकडून भरतीपुर्वी बस चालविण्याचे सर्व ट्रेनिंग दिले जाते. याचा योग्य अहवाल आल्यानंतरच प्रशासनाकडून कायम व कंत्राटी पद्धतीने बस चालक भरती केले जातात. मुंबईत सोमवारी घडलेल्या बेस्ट बसच्या दुर्दैवी अपघाताच्या पार्श्वभूमीवर केएमटीच्या बस चालक भरती प्रक्रियेचा घेतलेला आढावा….!
मुंबईतील कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये सोमवारी रात्री भरधाव बेस्टच्या बसने अनेकांना धडक दिली. या भिषण अपघातात तीन जणांच जागीच मृत्यू तर 20 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहीत मिळाली होती. यानंतर मंगळवारी मिळालेल्या आकडेवारीनुसार मृतांचा आकडा वाढून 7 वर पोहचला तर 49 नागरिक जखमी झाले. यातील अजुन काहीजन गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मिनी बस चालविणाऱ्यास अचानक अधुनिक ई बस चालविण्यास देण्यात आली. त्यास केवळ तीन दिवसाचे या बसचे प्रशिक्षण दिले असल्याचे यानंतर उघडकीस आले. यामुळे सार्वजाणिक वाहतूक सेवेतील चालक प्रशिक्षण हा कळीचा मुद्दा बनला आहे.
कोल्हापूर शहरातही नेहमी गर्दीतून बस चालवावी लागते. शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात तर शाळा भरताना व सुटताना प्रचंड गर्दी होत असते. सायंकाळच्या वेळीही कामावरून परत येणारे कर्मचारी व इतर कामासाठी नागरिक बाहेर पडलेले असतात. त्यातच शहरातील लहान रस्ते, रस्त्याकडेला पार्कींग व अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते व अडथळा निर्माण होत असतो. सणासुदीच्या काळात तर शहरातील रस्त्यावर प्रचंड गर्दी असते. पर्यटकांचीही रेलचेल असल्यामुळे रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. अशा दाटीवाटीतही प्रवाशांनी फुल्ल भरलेली केएमटी बस चालवावी लागते. चालकाची यामध्ये कसरत होते. अशा स्थितीत चालक हा अवजड वाहन चालविण्याचा अनुभव असणारा, परफेक्ट ट्रेन असणाराच लागतो. मुंबई सारखी घटना घडू नये यासाठी चालक भरतीवेळी सर्व निकष तपासणे आवश्यक आहे.
केएमटीमध्ये चालकांबाबतीत अधिक माहिती घेतली असता, सध्या, केएमटीमध्ये कायम व कंत्राटी मिळुन 200 चालक आहेत. एकूण 67 बसेस शहरातील विविध मार्गावर धावतात. चालक भरती ही नियमानुसार चालकाच्या सर्व बाबी तपासून केली जाते. यामध्ये पुर्ण क्षमतेने व तज्ञांमार्फत निवड झालेल्या चालकांची संपुर्ण वैद्यकीय तपासणी केली जाते. प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांच्या ताब्यात केएमटी बस दिली जात असल्याचा दावा केएमटी प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
‘ई’ बससाठी अनुभवीच चालक घेणार
मुंबईमध्ये ई बसला अपघात जाला आहे. सध्या केएमटीकडे ई बस नाही. पुढील महिन्यात केएमटीच्या ताफ्यात नवीन इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत. यामध्ये केंद्र सरकारच्यावतीने कंत्राटदारामार्फत चालक नियुक्ती केली जाणार आहे. याची सर्व जबाबदारी संबंधित कंपनीची राहणार असुन त्यांच्याकडूनही तज्ञ आणि अनुभवी चालकांचीच नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती केएमटी प्रशासनाने दिली आहे.
अशी असते भरती प्रक्रीया
बस चालकाची लेखी परिक्षेनंतर नियुक्ती झाल्यास ते बस सारखे अवजड वाहन चालविण्यास सक्षम आहे की नाही याची तपासणी केली जाते. केएमटी अपघात विभागाचे इन्स्पेक्टर त्यांना विशेष ट्रेनिंग देतात. चालक सक्षम असल्याचा अहवाल सादर झाल्यानंतरच प्रशासकीय पातळीवर त्यांची नेमणूक केली जाते. नियुक्त झालेल्या चालकाचा पुर्ण फिटनेस तपासला जातो.
चालकांसाठी वर्षातून दोनवेळा कार्यशाळा
केएमटी चालकांसाठी मनपा परिवहन विभागाच्यावतीने वर्षातून दोन वेळा कार्य शाळा घेतली जाते. यामध्ये चालाकाची आरोग्य तपासणी केली जाते. गर्दीत बस चालविण्याचे विशेष ट्रेनिंग दिले जाते. अपघात टाळण्यासाठी पुर्वी झालेल्या अपघातांचे व्हिडिओ सादरीकरणाद्वारे जनजागृती केली जाते. यासाठी देशभरात झालेल्या अपघातांचा आढावा घेतला जातो.
मोबाईल वापरणाऱ्यांवर कारवाई
केएमटी बस चालवत असताना चालक हेडफोन अथवा मोबाईलवर बोलताना आढळल्यास तत्काळ कारवाईचा बडगा उगारला जातो. यासाठी विशेष कर्मचारी लक्ष ठेवून असतात. मागील काही दिवसात चार ते पाच चालकांना समज व नोटीस देण्यात आली आहे.
विना अपघात चालाकाचा सत्कार
प्रादेशिक परिवहन कार्यालय व शहर वाहतुक पोलीस शाखेच्यावतीने रस्ता वाहतुक सुरक्षा सप्ताहात बश चालकांमध्ये वाहतुक नियमांची जाणीव करून दिली जाते. त्याचबरोबर वर्षभरात एकही अपघात न केलेले व नियमांचे काटेकोर पालन केलेल्या चालाकांचा विशेष सत्कार केला जातो.
विशेष कार्यशाळेतून जनजागृती
केएमटीमध्ये बस चालकाची नियुक्ती करताना शासनाच्या सर्व निकषांची तपासणी केली जाते. चालकावर कोणताही तणाव येवू नये यासाठी विशेष कार्यशाळेतून जनजागृती केली जाते. मुंबई अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष व परिपत्रकाद्वारे विशेष सुचना देण्यात आल्या आहेत. रोजच अहवाल घेवूनच ड्युटी दिली जाते.
सुनिल जाधव, वाहतुक निरिक्षक, केएमटी








