फादर एडी चषक फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : सेंट पॉल पोलाईट माजी विद्यार्थी संघटना व सेंट पॉल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने 55 व्या फादर एडी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या रविवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीत केएलएसने सेंट मेरिजचा, झेवियर्सने मराठी विद्यानिकेतनचा, सेंट पॉल्सने सर्वोदयचा तर लव्हडेलने संत मीराचा पराभव करुन उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. सेंट पॉल पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या फादर एडी स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात केएलएसने बलाढ्या सेंट मेरिजचा 4-2 असा पराभव केला. या सामन्यात 8 व्या मिनिटाला कर्णधार चैतन्य रामगुरवाडीच्या पासवर क्षितीज चिलाळने गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 25 व्या मिनिटाला केएलएसला पेनल्टी कॉर्नर मिळाला. शशांक आर. ने मारलेल्या फटक्यावर कर्णधार चैतन्या रामगुरवाडीने हेडद्वारे सुरेगा गोल करुन 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 34 व्या मिनिटाला शशांक आर. ने पेनल्टी कॉर्नरच्या फटक्यावर श्रेयस पेडणेकरने अप्रतिम गोल करुन 3-0 ची आघाडी केएलएसला मिळवून दिली. 40 व्या मिनिटाला सेंट मेरिजच्या श्रेयस बिराजदारने बचाव फळीला चकवत गोल करुन 1-3 अशी आघाडी कमी केली. 41 व्या मिनिटाला शशांक आर. ने मारलेला वेगवान फटका सेंट मेरिजच्या गोलरक्षकाला निटसा आडवता न आल्याने त्याचा फायदा उठवित नील बसरीकट्टीने 4 गोल करुन 4-1 ची आघाडी मिळवून दिली. 50 व्या मिनिटाला सनी सिंगच्या पासवर श्रेयस बिराजदारने 2 गोल करुन 2-4 अशी आघाडी कमी केली. हा सामना अतिशय रंगतदार झाला.
दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात गत उपविजेत्या सेंट झेवियर्सने मराठी विद्यानिकेतनचा 3-1 असा पराभव केला. 7 व्या मिनिटाला मराठी विद्यानिकेतनच्या प्रणव चौगुलेने गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर झेवियर्सने आक्रमक चढाया करत 10 व्या मिनिटाला विद्यानिकेतनच्या बचावफळीतील खेळाडूने चेंडू बाहेर काढण्याच्या नादात स्वत: गोलपोस्टमध्ये चेंडू मारुन स्वयमचीत गोल करुन दिला. त्यामुळे झेवियर्सने 1-1 अशी बरोबरी साधली. 11 व्या मिनिटाला झेवियर्सच्या रिझवान उचगावरकरने दुसरा गोल करुन 2-1 ची आघाडी मिळवून दिली. 19 व्या मिनिटाला रिझवान उचगावकरच्या पासवर सिद्धारुड सानिकोपने 3 गोल करुन 3-0 ची आघडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण दोन्ही संघांना अपयश आले. तिसऱ्या सामन्यात गत विजेत्या सेंट पॉल्स संघाने सर्वोदय खानापूर संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात 22 व्या मिनिटाला जोस्वा वॉजच्या पासवर शिनन कोलकारने गोल करुन 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्याच्या अनेक संधी वाया दवडल्याने दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. चौथ्या सामन्यात लव्हडेल संघाने संत मीरा संघाचा 7-1 असा पराभव केला. या सामन्यात 14, 16, 25, 26 व 34 व्या मिनिटाला लव्हडेलच्या विनस निंगथौजमने स्पर्धेची 5 वी हॅट्ट्रीय नोंदविली. तर 17 व्या मिनिटाला रोहित सिंगने तर 37 व्या मिनिटाला जोगेश शिंदेने गोल करुन 7-0 ची आघाडी मिळविली. 50 व्या मिनिटाला संत मीराच्या प्रणव देसाईने गोल करुन 1-7 अशी आघाडी कमी केली.
सोमवारी उपांत्य फेरीचे सामने : 1) सेंट पॉल्स वि. केएलएस, दुपारी 2 वा. 2) सेंट झेवियर्स वि. लव्हडेल, दुपारी 4 वा.









