हनुमान चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : एसकेई सोसायटी आयोजित हनुमान चषक 15 वर्षाखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत सोमवारी उद्घाटन दिवशी केएलएसने मराठा मंडळचा 9 गड्यांनी तर ज्ञानप्रबोधिनीने वनिता विद्यालयाचा 111 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. सोहम पाटील (केएलएस), आयुष सरदेसाई (ज्ञानप्रबोधनी) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भाग्यनगर अनगोळ येथील प्लॅटिनम जुबली क्रिकेट मैदानावर उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केएलई फिजिओथेरपीचे विभाग प्रमुख डॉ. बसवराज मोतीमठ, प्लॅटिनम जुबली मैदानाचे चेअरमन आनंद सराफ, उमेश कुऱ्याळकर, डॉ. रामकृष्ण एन., पुरस्कर्ते आनंद सोमनाचे, आनंद रत्न्यापगोळ, विनय नाईक, विवेक पाटील, बाळकृष्ण पाटील, प्रसाद नाकाडी, अनंत खोरागडे, महांतेश गवी आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते यष्टी पूजन व खेळाडूंची ओळख करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तेजस पवार, गणेश, उमेश मजुकर आदी उपस्थित होते.
उद्घाटन सामन्यात मराठा मंडळने प्रथम फलंदाजी करताना 17.2 षटकात सर्व गडी बाद 73 धावा केल्या. त्यात साईराज एम. ने 2 चौकारांसह 20 तर सर्वज्ञ पाटीलने 12 धावा केल्या. केएलएसतर्फे सिद्धार्थ रायकरने 16 धावात 3 तर वेदांत दुधाने, सोहम पाटील, सुरेंद्र पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलएसने 10.2 षटकात 1 गडी बाद 74 धावा करून सामना 9 गड्याने जिंकला. त्यात सोहम पाटीलने 4 चौकारांसह नाबाद 43 तर सिद्धार्थ रायकरने 11 धावा केल्या. मराठा मंडळतर्फे मुकुंदने 1 गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात ज्ञानप्रबोधनीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी बाद 170 धावा केल्या. त्यात पार्थ उच्चुकरने 5 चौकारांसह नाबाद 41, आयुष सरदेसाईने 31, आयुषने 29, अद्वेत भाटीने 21 धावा केल्या. वनितातर्फे जोया काझी व फराज काझी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना वनिता विद्यालयाने 20 षटकात 9 गडी बाद 59 धावाच केल्या. त्यात फराज काझीने 14 धावा केल्या. ज्ञानप्रबोधनीतर्फे आयुष सरदेसाई व आयुषमान यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.









