जैन हेरिटेज, लव्हडेल, फिनिक्स पब्लिक संघ विजयी : फादर एडी फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : पोलाईटस सेंट पॉल्सचे माजी विद्यार्थी संघटना व सेंट पॉल्स स्कूल आयोजित फादर एडी 55 व्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत उद्घाटनादिवशी केएलएस, कॅन्टोमेंट, जैन हेरिटेज, फिनिक्स पब्लिक, सेंट मेरीज, लव्हडेल संघांनी आपल्या प्रतिस्पर्धावर मात केली. सेंट पॉल्सच्या हॉस्टेल मैदानावरती आयोजित करण्यात आलेल्या 55 व्या फादर एडी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलीस आयुक्त पी. व्ही. स्नेहा, नागेश छाब्रीया, सुमूक छाब्रीया, रेक्टर फादर सिमन फर्नांडीस, सेंट पॉल्स स्कूलचे मुख्याध्यापक फादर साव्हीओ अॅब्रु, उपप्राचार्य सबॅस्टीन परेरा, फादर स्टिव्हन अलमेडा, डॉ. पद्मनी रविंद्रन आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित संघानी पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. हवेत रंगीबेरंगी फुगे सोडून स्पर्धेला चालना देण्यात आली. उद्घाटन सामन्याचे खेळाडू केएलएस व कणक मेमोरियलच्या खेळाडूंची पाहुण्यांना ओळख करून देण्यात आली. त्यानंतर स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी परेश मुरकुटे, अनिकेत कसोटीया, अमित पाटील व पोलाईडसचे पदाधिकारी उपस्थित होते. पहिल्या सामन्यात केएलएस संघाने कनक मेमोरियल संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 21 व्या मिनिटाला शशांक आर. च्या पासवर चैतन्य रामगुरवाडीने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 27 व्या मिनिटाला चैतन्य रामगुरवाडीच्या पासवर श्रेयस पेडणेकरने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. 35 व्या मिनिटाला मैदानाच्या कर्णधार चैतन्य रामगुरवाडीने चेंडू गोलमुखात मारून गोलात रूपांतर करीत 3-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात कॅन्टोमेंट संघाने भरतेश संघाचा 5-0 असा पराभव केला. या सामन्यात 15, 24 व 39 व्या मिनिटाला कॅन्टोमेंटच्या इसा सराफने सलग 3 गोल करून स्पर्धेतील पहिली हॅट्ट्रीक मिळविली. तर 44 व 45 व्या मिनिटाला कॅन्टोमेंटच्या रेहमानने 2 गोल करून 5-0 ची आघाडी मिळवून दिली.
तिसऱ्या सामन्यात फिनिक्स पब्लिक संघाला अंगडी संघाने 1-1 अशा बरोबरीत रोखले या सामन्यात 14 व्या मिनिटाला फिनिक्स पब्लिक संघाचा प्रज्वल वाय. ने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात खेळ संपण्यास काही मि. बाकी असताना अंगडीच्या आर्यन बिस्तीने बरोबरी राखली. त्यानंतर पंचानी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये फिनिक्स पब्लिकने विजय संपादन केले. चौथ्या सामन्यात जैन हेरिटेजने भरतेश सेंट्रल संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. दुसऱ्या सत्रात 32 व्या मिनिटाला जैन हेरिटेजच्या अथर्व अक्कीने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भरतेशने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. पाचव्या सामन्यात सेंटमेरीज संघाने एमव्हीएम संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 12 व 15 व्या मिनिटाला सनी पिटकेने सलग 2 गोल करून पहिल्या सत्रात 2-0 ची आघाडी दिली. तर 38 व्या मिनिटाला राहिल मकानदारने तिसरा गोला करून 3-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात एमव्हीएम संघाला गोल करण्यात अपयश आले. सहाव्या सामन्यात लव्हडेल संघाने केएलएस पब्लिक संघाचा 7-0 असा पराभव केला. या सामन्यात 1, 4, 13 व 16 व्या मिनिटाला लव्हडेलच्या रोहित सिंगने सलग 4 गोल करीत स्पर्धेतील दुसरी हॅट्ट्रीक नोंदविली. 7 व 24 व्या मिनिटाला लव्हडेलच्या रोनॉल्डो सिंगने 2 गोल केले. तर 23 व्या मिनिटाला जगदीश सिंगने गोल करून 7-0 ची आघाडी लव्हडेल संघाला मिळवून देत केएलएस पब्लिक स्कूलचा एकतर्फी पराभव केला.
शनिवारचे सामने : 1) केंद्रीय विद्यालय वि. सेंटपॉल्स सकाळी 9 वाजता. 2) ज्योती सेंट्रल स्कूल वि. सेंट झेवियर्स सकाळी 10. 30 वाजता. 3) ज्ञान प्रबोधन मंदिर वि. केएलएस स्कूल 12 वाजता. 4) संत मीरा वि. जैन हेरिटेज 1.30 वाजता. 5) कॅन्टोमेंट वि. सर्वोदय खानापूर दुपारी 3 वाजता. 6) मराठी विद्यानिकेत वि. फिनिक्स पब्लिक दुपारी 4.30 वाजता यांच्या खेळविण्यात येणार आहे.









